आयपीएल 2026 स्पर्धेत कोण कोणत्या संघातून खेळणार? कोणाला रिलीज करणार? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. सध्या फॉर्मात असलेल्या खेळाडूंवर फ्रेंचायझींची नजर आहे. इतकंच काय तर मागच्या पर्वात सुमार कामगिरी केलेल्या खेळाडूंना डच्चू देण्याची तयारी केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने या स्पर्धेपूर्वी फासे टाकण्यास सुरुवात केली आहे. संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अभिषेक नायर याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता इतरही चर्चा गरम झाल्या आहेत. आता रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडून कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत जाणार अशी अफवा उडाली आहे. त्यात मुंबई इंडियन्सने केलेल्या क्रिप्टिक पोस्टमुळे संभ्रम वाढला आहे. खरं तर मुंबई इंडियन्सने सोशल मिडिया हँडलवर रोहित शर्माचा फोटो पोस्ट करत उत्तर दिलं आहे. मुंबई इंडियन्सने शाहरूख खानचा डायलॉग लिहून उडलेल्या अफवा शांत केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्माने आपल्या फलंदाजीचा दणका दाखवला. पहिल्या सामन्यात फक्त 8 धावा करून बाद झाला होता. पण उर्वरित दोन सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. तिसऱ्या वनडे सामन्यात शतकी खेळी करत आपल्या फलंदाजीचं अस्तित्व दाखवून दिलं. या मालिकेत रोहित शर्माने 202 धावा केल्या आणि मालिकावीराचा पुरस्कारही पटकावला. रोहित शर्मा वनडे क्रिकेटमधील नंबर एक खेळाडू आहे. त्यामुळे रोहित शर्मा उडालेल्या अफवेवर मुंबई इंडियन्सने पोस्ट करत लिहिलं की, ‘𝗦𝘂𝗻 𝘄𝗶𝗹𝗹 𝗿𝗶𝘀𝗲 𝘁𝗼𝗺𝗼𝗿𝗿𝗼𝘄 𝗮𝗴𝗮𝗶𝗻 ye ये तो कंफर्म है, लेकिन (K)night मुश्किल ही नहीं, नामुमकिन है.’
रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच वेळा जेतेपदाला गवसणी घातली आहे. तसेच आयपीएल स्पर्धेत फलंदाजीतही योगदान दिलं आहे. रोहित शर्माने 272 आयपीएल सामन्यात 7046 धावा केल्या आहेत. यात 2 शतकं आणि 47 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये त्याने 304 षटकार आणि 640 चौकार मारले आहे. पण रोहित शर्माकडे कर्णधारपद नाही. मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे आहे. त्यामुळे त्याच्यासाठी इतर फ्रेंचायझी फिल्डिंग लावून आहेत. पण मुंबई इंडियन्स रोहित शर्माला काही सोडणार नाही.






