ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगात निघालेल्या चारचाकी समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या आजोबा आणि नातीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
सानिका संजय सपकाळ (वय २३, रा. कुंभोज) आणि आनंदराव बापू जाधव (६५, रा. लाडेगाव, जि. सांगली) अशी मृतांची नावे आहेत. याबाबतचा गुन्हा रात्री उशिरा हातकणंगले पोलिसांत दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लाडेगाव येथील श्री. जाधव यांची मुलगी कुंभोज येथे दिली आहे. ते मुलीकडे आले असता नात सानिका आणि आजोबा जाधव दोघेही दुचाकीवरून (एमएच १०, डीयू ४३०६) कामानिमित्त इचलकरंजीला गेले होते. तेथून परतताना सोमवारी सकाळी हातकणंगले-कुंभोज मार्गावरील कबनूर येथील रोहित सुरेश चौगुले यांचा रिकामा ट्रॅक्टर (एमएच ११, यू ९८७८) येत होता. त्याच्या मागून शुभम अजित गोपुडगे हे आपली चारचाकी घेऊन येत होते.
ट्रॅक्टरला ओव्हरटेक करून पुढे येताच चारचाकीची समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसली. यात श्री. जाधव व सानिका गंभीर जखमी झाले. त्यांना सुरुवातीला हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना दोघांचाही मृत्यू झाला.


