महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने 23 नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) आयोजित करण्यात येत आहे. या परीक्षेची कठीण पातळी लक्षात घेता उमेदवारांकडून जोरदार तयारी केली जात असली तरी, परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना लक्षात घेणे आवश्यक ठरणार आहे.
गैरप्रकार रोखण्यासाठी नाशिकसह राज्यभर कडक पाळत ठेवली जाणार आहे.
राज्यातील पहिली ते आठवी इयत्तांपर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा देणे बंधनकारक आहे. या परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातून तब्बल 19 हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर रोजी सर्व शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा सक्तीची करण्याचा निर्णय दिल्यानंतर शिक्षक संघटनांनी या निर्णयाचा विरोध दर्शवला होता.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे टीईटी सक्तीचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. दरम्यान, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शिक्षक संघटनांना आश्वासन दिले होते की राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विलोकन याचिका दाखल करेल. मात्र, राज्य सरकारकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने टीईटी परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजीच होणार आहे.
राज्यभरातील एकूण 4 लाख 75 हजार 668 उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. नाशिकमध्ये 54 परीक्षा केंद्रांवर टीईटी होणार असून, केंद्र संचालक आणि उपसंचालकांना परीक्षेच्या काळात रजा घेण्यास मनाई करण्यात आली आहे. परीक्षेच्या सुरळीत पार पडण्यासाठी 54 केंद्रसंचालक व उपकेंद्रसंचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना परीक्षेपूर्व प्रशिक्षण देण्यात आले असून, 22 आणि 23 नोव्हेंबरला ते उपस्थित राहणे बंधनकारक ठरणार आहे.
प्राथमिक स्तरावरील (पेपर-1) परीक्षेसाठी 2 लाख 30 हजार 333 उमेदवारांनी नोंदणी केली आहे, तर माध्यमिक स्तरावरील (पेपर-2) परीक्षेसाठी 2 लाख 72 हजार 335 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. उमेदवारांची वाढलेली संख्या लक्षात घेता परीक्षा केंद्रांची संख्या यंदा वाढवण्यात आली आहे.
या वेळी गैरप्रकार टाळण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. सर्व केंद्रांवर एकाचवेळी डिजिटल कॅमेऱ्याच्या निगराणीत परीक्षा घेतली जाईल. उमेदवारांची बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवली जाणार असून, छायाचित्रांची ओळख पडताळणीसाठी एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. अशा कठोर उपाययोजनांमुळे यंदाची टीईटी परीक्षा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे.




