आयपीएल 2026 च्या ऑक्शनचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. या ऑक्शनपूर्वी रिटेन खेळाडूंची अंतिम यादी जाहीर करण्याची मुदत शनिवारपर्यंत (15 नोव्हेंबर) आहे. त्यापूर्वी सर्वच फ्रँचायझी अन्य टीममधून आपल्याला हवे असणारे खेळाडू घेण्याच्या प्रयत्नात आहेत.
चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या दोन टीममध्ये रविंद्र जडेजा आणि संजू सॅमसन यांच्यात अदलाबदल होणार अशी जोरदार चर्चा आहे. पण त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेलं नाही. ही चर्चा सुरु असतानात मुंबई इंडियन्सनं बाजी मारलीय. टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडूला मुंबई इंडियन्सनं ऑक्शनपूर्वीच करारबद्ध केलं आहे.
मुंबई इंडियन्समध्ये कुणाचा समावेश?
आयपीएल 2026 पूर्वी मुंबई इंडियन्सनं शार्दुल ठाकूरला करारबद्ध केलं आहे. तो मागील सिझनमध्ये लखनौ सुपर जायंट्स (LSG) टीमकडून खेळत होता. त्याला लखनौकडून मुंबईनं खरेदी केलंय. मुंबई इंडियन्सनं ही अधिकृत घोषणा केली आहे.
मुंबईकर शार्दुल ठाकूरची ही सातवी आयपीएल टीम आहे. यापूर्वी पंजाब किंग्ज, रायझिंग पुणे सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स या सहा टीमचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामधील चेन्नईकडील त्याची इनिंग चांगलीच गाजली. शार्दुलनं आत्तापर्यंत 105 आयपीएल मॅचमध्ये 107 विकेट्स घेतल्या आहेत. तर 68 हा त्याचा आयपीएलमधील सर्वोच्च स्कोअर आहे.
त्याचबरोबर त्यानं 13 टेस्टमध्ये 33, 47 वन-डेमध्ये 65 तर 25 आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 33 विकेट्स घेतल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याचा अनुभव मोठा आहे. त्यानं 101 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 307 तर 118 लिस्ट A मॅचमध्ये 180 विकेट्स घेतल्या आहेत.
मुंबई इंडियन्सकडं जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट आणि हार्दिक पांड्या असा अनुभवी फास्ट बॉलिंग अटॅक आहे. शार्दुलच्या समावेशानं त्यांची बॉलिंग आणखी मजबूत झालीय. तसंच त्याची बॅटिंगही उपयुक्त आहे.



