इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी चार दिवसांपूर्वी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाली असताना राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे आदेश जारी केले आहेत
ओबीसी सर्वसाधारण, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला आरक्षणाची सोडत नव्याने काढण्यासंदर्भात महापालिकेला निर्देशही दिले. नव्या कार्यक्रमानुसार 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात आरक्षण सोडत होणार आहे. नव्याने आरक्षण सोडत होणार असल्याने शहरात विशेषत: राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
नुकत्याच झालेल्या आरक्षण सोडतीनंतर स्वत:ची उमेदवारी पक्की समजणाऱ्यांची फेरसोडतीच्या धास्तीने पंचाईत झाली आहे तर ज्यांची गैरसोय झाल्यामुळे हिरमोड झाला होता, त्यांच्यात मात्र चैतन्य संचारले आहे. चार वर्षांनंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. 16 प्रभागांतून 65 नगरसेवक निवडले जाणार आहेत. चार सदस्यीय पद्धतीने होणाऱ्या प्रभागनिहाय निवडणुकीसाठी 11 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतही जाहीर झाली. यामुळे राजकीय हालचालीही गतीमान झाल्या.
मात्र निवडणूक आयोगाने शुक्रवारी रात्री सोडतीसंदर्भात नव्याने आदेश जारी केले. आयोगाने एससी, एसटी व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या आरक्षित जागांची संख्या कायम राहणार आहे. मात्र नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला या दोन प्रवर्गासाठीचे आरक्षण पुन्हा सोडतीद्वारे निश्चित केले जाणार आहे. नव्याने आरक्षण सोडत होणार असल्याने सर्वसाधारण महिला तसेच सर्वसाधारण गटातील आरक्षणावरही त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. नव्या कार्यक्रमामुळे राजकीय समीकरणेही बदलणार आहेत.




