Friday, February 13, 2026
Homeकोल्हापूर"इजान, तुला जेवण वाढते." आईच्या हाकेच्या काही क्षणांत पाच वर्षांच्या चिमुकला पाण्याच्या...

“इजान, तुला जेवण वाढते.” आईच्या हाकेच्या काही क्षणांत पाच वर्षांच्या चिमुकला पाण्याच्या खड्ड्यात; कोल्हापूर हादरले

इजान पाच वर्षाचा होता. खेळकर होता. काल दुपारी आईने त्याच्या आवडीचा इंद्रायणी तांदळाचा भात केला होता. ‘इजान कोठे जाऊ नको, तुला जेवण वाढते,’ असे सांगून आई हिना स्वयंपाक घरात गेली.

 

 

यावेळी इजान रस्त्यावरच खेळत होता. त्याच्यासोबत त्याच्याच वयाची मुलेही होती.

 

ताट तयार करून आई बाहेर आली तेव्हा इजान रस्त्यावर नव्हता. आवाज दिला. आजूबाजूला पाहिले. शेजाऱ्यांकडे चौकशी केली. पण, इजान दिसला नाही. नंतर शोधाशोध सुरू झाली. सायंकाळी पाचच्या सुमारास मस्‍जिदीवरील सीसीटीव्ही पाहिले तेथे तो शेजारील पाण्यावर शेवाळ आलेल्या खड्ड्याकडे जाताना दिसला. पण, वेळ निघून गेली होती. इजान मृतावस्थेत दिसला.

 

जवाहरनगर जवळील सरनाईक वसाहतीत घरासमोर सुन्न अवस्थेत बसलेले इजान बारगीरचे वडील आक्रम बोलत होते. जो खड्डा बुजविण्यासाठी आम्ही मोर्चे काढले, आंदोलन केले, त्याच खड्ड्यात पडून आज ‘इजू’ गेला. त्याला न्याय मिळाला पाहिजे. शेजारी शाळा आहे. अजून किती इजान जाण्‍याची वाट पाहणार आहेत, असे म्हणत त्यांनी राग व्यक्त केला.

 

छोट्या गल्लीतील छोट्या दुमजली घरात आज रोज खेळणारा इजान दिसत नव्हता. गल्लीतील महिला, नातेवाईक, मित्रमंडळींची सांत्वनासाठी रीघ होती. इजानची आठ वर्षांची बहीण असनाद अधूनमधून आक्रम यांच्याजवळ येऊन बसत होती. ‘इजानला चिलीमिली आवडत होती,’ हेही सांगा असेही ती म्हणत होती. हे पाहून तेथे सर्वांचे डोळे पाणावले. आक्रम ते सांगू लागले.

 

जेवनाचे ताट तयार असताना इजान दिसत नाही म्हणून मला हिनाचा कॉल आला. मी फर्निचरचे काम करतो. कामावरून थेट घरी आलो. नेहमी मला पाहून येणारा इजान आज दिसत नव्हता. मी घरी आलो की, तो पायाला घट्ट मिठी मारत होता. त्याला बोलता येत नव्हते. केवळ अम्मा, आब्बा असे एक दोन शब्दांतच तो आम्हाला बोलवत होता.

 

त्याला शोधण्याची वेळ काल आली. विक्रमनगरपासून राजेंद्रनगरपर्यत त्याला शोधण्याची मोहीम सुरू झाली. अनेक जण शोध घेऊ लागले. त्याला रिक्षात बसायची हौस होती. गल्लीतील रिक्षाचालक त्याला फेरी मारून आणत होते. त्यामुळे दिसेल त्या रिक्षा चालकाला त्याचा फोटो मोबाईलमध्ये दाखवून ‘आमचा इजान कोठे दिसला काय’ असे विचारत होतो.

 

बिजली चौकाकडे गेलो. कदम यांच्या घराजवळील सीसीटीव्ही पाहिले. तेथेही काहीच दिसले नाही. त्यावेळी घराजवळील सीसीटीव्ही पाहण्याचे सूचले. परिसरातील मस्‍जिदीवर सीसीटीव्ही पाहण्यासाठी आलो तेथे इजान शेवाळ आलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्याकडे गेल्याचे दिसले. आम्ही खड्डे पाहिले, तेव्हा इजान त्यामध्ये दिसला, असे सांगताच त्यांना आलेला हुंकदा त्यांनी

आवरता घेतला.

 

अनेकांनी केले सांत्वन

 

आमदार अमल महाडिक यांच्यासह नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांनी बारगीर कुटुंबीयांची आज भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी कुटुंबीयांना अधिकाधिक रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, अतिक्रमण थांबवावे, खड्डा बुजवावा, गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -