स्पर्धा परीक्षेत अपयश आल्यामुळे तरुणीने सोमवारी (दि. २१) जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन जीवन संपविले. वैष्णवी रामचंद्र पाटील (वय २३, रा. भामटे, ता. करवीर) असे तिचे नाव आहे.
वैष्णवी दोन वर्षांपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. दोन महिन्यांपूर्वी रेल्वेच्या परीक्षेत दोन मार्कात आलेल्या अपयशामुळे काही दिवसांपासून ती नैराश्यात असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
वैष्णवीने बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. वडील शेती तर आई घरकाम करते. दोन वर्षांत तिने विविध परीक्षा दिल्या. मात्र, तिला अपयश येत होते. तिने रेल्वेची परीक्षा दिली. यामध्ये तिला अपयश आले. यामुळे ती नैराश्यात होती. सोमवारी रात्री वैष्णवीने गळफास घेतल्याचे दिसले. नातेवाईकांनी वैष्णवीला बेशुद्धावस्थेत सीपीआरमध्ये दाखल केलेे. मात्र, उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिस अंमलदार शशिकांत पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
