इचलकरंजी: गुन्हेगारी टोळ्यांची सोशल मीडियावर भाईगिरी; ‘भशहरातील रस्त्यांवर दहशत माजवणाऱ्या टोळ्यांनी आता सोशल मीडियालाच रणांगण बनवले आहे. ‘भाई’, ‘किंग’, ‘साम्राज्य’, ‘गँग’, ‘बकासूर’ अशा टोपणनावांनी तयार झालेल्या अकाउंट्सवरून एकमेकांना खुलेआम आव्हान देणे, धमक्या देणे आणि त्यानंतर प्रत्यक्ष हल्ले करून त्यांचे व्हिडिओ ‘रिल्स’ स्वरूपात व्हायरल करणे, हा नवा आणि धोकादायक पॅटर्न शहरात दिसू लागला आहे.
आतापर्यंत सोशल मीडियाचा वापर छबी निर्माण करण्यासाठी करणाऱ्या या टोळ्यांनी थेट ‘डिजिटल टोळीयुद्धा’कडे कूच केली आहे. एखाद्या टोळीने दुसऱ्याला पोस्टद्वारे उघड आव्हान दिले की, काही दिवसांतच प्रत्यक्षात हल्ला घडवून आणला जातो, आणि त्या घटनेचे चित्रीकरण करून तेच व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले जातात. ‘आव्हान स्वीकारले’, ‘आता नंबर तुझा’, ‘गँगचा निर्णय’ अशा मजकुरासह हे व्हिडिओ शेअर होत असून, त्यातून भीती आणि प्रसिद्धीचा दुहेरी परिणाम साधला जात आहे.
अलीकडे घडलेल्या काही घटनांत सोशल मीडियावरील पोस्ट हा थेट हल्ल्याचा ट्रिगर ठरल्याचे दिसून आले आहे. एकाने दुसऱ्या टोळीला सार्वजनिकरीत्या आव्हान दिल्यानंतर काही तासांतच संबंधितावर हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे हल्ल्याचा व्हिडिओ शूट करून तो ‘रील’ म्हणून व्हायरल केला.
पार्श्वभूमीला आक्रमक संगीत,’भाईगिरी’चे संवाद आणि प्रतिस्पर्ध्याची हेटाळणी अशा पद्धतीने तयार केलेल्या या व्हिडिओंमुळे गुन्हेगारीला दहशतीचा मुलामा दिला जात आहे. या डिजिटल प्रदर्शनामुळे तरुणांत चुकीचा संदेश जात आहे. ‘लाईक्स’ आणि ‘फॉलोअर्स’च्या आकड्यांवरून ताकद मोजली जात असून, प्रत्यक्ष गुन्ह्यापेक्षा त्याचे सोशल मीडियावरील प्रतिष्ठा अधिक महत्त्वाची ठरत आहे.
दहशतीचा बदलता चेहरा
इचलकरंजीतील गुन्हेगारीचा चेहरा केवळ गल्लीबोळांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो ‘लाईव्ह’, ‘रील’ आणि ‘स्टोरी’च्या माध्यमातून हजारो मोबाईल स्क्रीनवर झळकू लागला आहे. आव्हान, प्रतिहल्ला आणि त्याचे डिजिटल प्रक्षेपण या चक्रातून टोळीयुद्ध अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरही कायद्याचा धाक निर्माण करणे गरजेचे बनले आहे.
तरुणांवर वाढता प्रभाव
या सर्व घडामोडींत सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे शहरातील तरुण वर्गावर होत असलेला परिणाम. गुन्हेगारीच्या रील्सना मिळणारे हजारो व्ह्यूज आणि कमेंटस् हेच टोळ्यांसाठी प्रोत्साहन ठरत आहे. कायद्याची भीती कमी आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धी अधिक महत्त्वाची वाटू लागल्यास शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पोलिस कारवाई की औपचारिकता
शहरात सोशल मीडियावर दहशतीचे व्हिडिओ प्रसारित होताच संबंधितांना पोलिस ठाण्यात बोलावून ‘पुन्हा असे करणार नाही’, अशी लेखी हमी घेतली जाते किंवा माफी मागितल्याचा व्हिडिओ तयार करून त्यांना सोडून दिले जाते. मात्र, ही कारवाई तात्पुरती ठरत असून, संबंधितांकडून त्यावेळी अकाउंट डिलीट केले जाते आणि काही दिवसांतच नव्या नावाने पुन्हा सुरू करून दहशतीचेच सत्र सुरू होते. या प्रकारामुळे ‘डिजिटल दहशती’वर पोलिसांची कारवाई केवळ औपचारिक राहत असल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.





