कोल्हापूर शहरातील शेंडा पार्क परिसरात आयटी पार्क विकसित करण्यासाठी ३४ हेक्टर ३६ गुंठे जमीन देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
या निर्णयासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार अमल महाडिक यांनी विशेष प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले.
या निर्णयामुळे संबंधित जमीन उद्योग विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) माध्यमातून येथे आयटी पार्क विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे कोल्हापूरसह परिसरातील आयटी क्षेत्रातील तरुण-तरुणींना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणातील कुशल आयटी मनुष्यबळ पुणे, बेंगळुरू, मुंबई, हैदराबाद तसेच परदेशात कार्यरत आहे. शेंडा पार्क येथील आयटी पार्कमुळे या क्षेत्रातील तरुणांना कोल्हापुरातच रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून मोठ्या आयटी कंपन्या येथे आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रस्तावानुसार शेंडा पार्क परिसरातील गट क्रमांक ५८३, ५८७ व ५८८ मधील एकूण ३६ हेक्टर ३६ गुंठे जमीन प्रथम महसूल विभागाकडे समर्पित करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यापैकी ३४ हेक्टर ३६ गुंठे जमीन आयटी पार्क उभारणीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित केली जाणार आहे. ही जमीन कृषी दराने प्रचलित बाजारमूल्यानुसार रक्कम वसूल करून भोगवटादार वर्ग-२ या धारणाधिकाराने देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
शेंडा पार्क परिसर मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत असून, परिसरात मोठी नागरी वस्ती तसेच शैक्षणिक संस्था विकसित होत आहेत. जवळच शिवाजी विद्यापीठासह विविध नामांकित शैक्षणिक संस्था असल्याने कुशल मनुष्यबळ सहज उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
याच परिसरात सुमारे २५ एकर जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि २५ एकर जागेवर उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी जागा प्रस्तावित आहे. तसेच नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकामही सुरू आहे. त्यामुळे या भागात आयटी पार्क उभारल्यास कोल्हापूरच्या औद्योगिक व शैक्षणिक विकासाला चालना मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शेंडा पार्क येथे आयटी पार्क उभारणीसाठी ३४.३६ हेक्टर जमीन AIDC कडे हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. आमदार अमल महाडिक यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.
विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर लगेचच आमदार महाडिक यांनी कोल्हापुरातील आयटी पार्क साठी पाठपुरावा सुरू केला होता. यासाठी त्यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार, उद्योग मंत्री उदय सामंत यांना निवेदने दिली होती. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समवेत बैठक घेत कृषी विभागाकडील जागा हस्तांतरणासाठी महाडिक आग्रही होते.
कोल्हापुरातील आयटी इंजिनिअर्सना सुविधांअभावी पुणे,बंगळुरू, हैदराबाद यासारख्या शहरांमध्ये स्थलांतरित व्हावे लागत होते. हे ब्रेन ड्रेन रोखण्यासाठी आयटी पार्क गरजेचे असल्याचे महाडिक यांनी अधोरेखित केले होते.
या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी ३४.३६ हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे कृषी विभागाची जमीन उद्योग विभागाकडे हस्तांतरित होणार आहे. शेंडा पार्क येथे होणाऱ्या आयटी पार्कमुळे कोल्हापुरातील तरुण-तरुणींना स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध होणार आहे. कोल्हापूरकरांना दिलेल्या वचनाच्या वचनपूर्तीचा मनस्वी आनंद होत असल्याची प्रतिक्रिया आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केली आहे.






