लवकरच होणार ऋषभ पंतचे पुनरागमन!

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतरच पंतची खरी रिकव्हरी सुरू होणार आहे.30 डिसेंबर रोजी पंत याचा कार अपघात झाला होता. यानंतर त्याला काही दिवस डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर बीसीसीआयने त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले, जेथे पंतच्या लिगामेंटची शस्त्रक्रिया करण्यात आली.

इनसाइडस्पोर्ट्सशी बोलताना बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पंतच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे. पंत असेच बरे राहिल्यास त्याला या आठवड्यातच डिस्चार्ज मिळेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला पंत याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर या युवा क्रिकेटरने सोशल मीडियावर एक अतिशय भावनिक पोस्ट लिहिली. त्याने या पोस्टमध्ये लिहिले की, ‘माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल सर्वांचे आभार. तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने मी झपाट्याने बरा होत आहे. तुम्हा सर्वांना माहित आहे की माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे आणि मी वेगाने बरा होत आहे. तुमच्या प्रेमाने मला वाईट काळात बळ दिले. सर्वांना धन्यवाद.’

पंतला पूर्णपणे बरे होण्यासाठी वेळ लागणार आहे. तो यंदाच्या आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. त्याचवेळी भारतातच होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचा निर्णय झालेला नाही. मात्र, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पंत पूर्णपणे बरे होण्यावर लक्ष केंद्रित करेल.

Join our WhatsApp group