नीट परीक्षा १२ सप्टेंबरलाच होणार


वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स एक्झाम अर्थात नीट (NEET) परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार नीट (NEET) परीक्षा १२ सप्टेंबर रोजीच होईल, असे न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी स्पष्ट केले. ज्या विद्यार्थ्यांना परिक्षेच्या तारखेबाबत आक्षेप आहे, त्यांनी परिक्षेचे आयोजन करणार्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीसमोर (एनटीए) आपली बाजू मांडावी, असा सल्लाही न्यायालयाने दिला आहे.

सीबीएसई परिक्षेत कमी गुण आल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी इम्प्रूव्हमेंट फॉर्म भरले आहेत, अशा काही विद्यार्थ्यांनी ‘नीट’ परिक्षेची तारीख बदलली जावी, असे सांगत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
तर ‘नीट’ परिक्षेच्या दिवशीच सीबीएसईचे काही पेपर आहेत, असा युक्तीवाद काही अन्य विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता.

ज्या विद्यार्थ्यांना तारखेबाबत आक्षेप आहेत, त्यांनी आपले म्हणणे एनटीएसमोर मांडावे, असे निर्देश न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांनी सुनावणीदरम्यान दिले.
कंपार्टमेंट परिक्षांमुळे ‘नीट’ परिक्षेची तारीख बदलण्यास नकार देण्यात आल्याने अशा विद्यार्थ्यांनाही धक्का बसला आहे.
आमच्या प्लॅटफॉर्मचा उपयोग प्राधिकरणांवर दबाब टाकण्यासाठी केला जाऊ नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
सुमारे 16 लाख विद्यार्थी ‘नीट’ परिक्षेसाठी मेहनत करीत आहेत. परिक्षेसाठी अॅडमिट कार्ड देण्यात आले आहे.
शिवाय सरकारने परिक्षेसाठी आवश्यक ती तयारी केली आहे. अशावेळी तारीख पुढे ढकलली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले.
तात्पुरत्या स्वरुपात कंपार्टमेंटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना ‘नीट’ परिक्षेला बसण्याची मुभा दिली जाऊ शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

Leave a Reply

Join our WhatsApp group