संविधान दिन : संविधान हाच जगण्याचा मार्ग

ताजी बातमी ऑनलाइन टीम

भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. लोकशाहीची प्रकृती जेव्हा जेव्हा बिघडते तेव्हा लोकशाहीला आधार देणारा, ऑक्सिजन देणारा एक मार्ग म्हणून संविधान आहे. संविधानच आपल्या जगण्याचा मार्ग आहे. तोच नेमका विचार आहे, हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे.

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात विविध छोटी-छोटी राज्ये होती. या राज्यांची मोट बांधणे आणि त्यांच्यात आपण सगळे एक आहोत ही संकल्पना रुजवून नव्या आकांक्षा निर्माण करणे ही बाब भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्यक्षात आली आहे. लोकशाही प्रत्यक्षात आणण्यामध्ये संविधानाचा फार मोठा वाटा आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण सामाजिक न्याय आणि विषमताविरोधी वागणूक, बंधुता आणि स्वातंत्र्य ही मूलभूत हक्कांची चौकट तयार केली. यामधून सर्व घटकांना न्याय मिळाला पाहिजे, हा एक आशावाद तयार केला.

शासन यंत्रणेच्या माध्यमातून व्यवस्थानिर्मितीचे काम संविधानाने केले. कारण, धर्मसंस्था आपल्या भावनांवर आधारित असतात. त्याचा प्रमुख कोणी एक नसतो. निरनिराळे लोक त्याचे प्रमुख असतात. भारतामध्ये वेगवेगळे धर्म मूळ धरून राहणारे आहेत. त्याचप्रमाणे संविधान आणि त्यातील लोकशाहीचे तत्त्व मूळ धरून राहण्यासाठी शासन ही एक यंत्रणा आहे. ही यंत्रणा अथवा व्यवस्था माणसांकडूनच कार्यान्वित आणि संचलित होत असते, तरीही या जिवंत माणसांकडून म्हणजेच व्यवस्थेकडूनही अन्याय, अत्याचार होऊ शकतो

हे ओळखूनच संविधानाने त्यांना काही जबाबदार्‍या आणि कर्तव्ये दिलेली आहेत. या व्यवस्थेतील कोणीही हुकूमशाही पद्धतीने वागू शकणार नाही, यासाठीची ही रचना आहे. म्हणूनच संविधान हा लोकशाही जिवंत ठेवणारा एक महत्त्वाचा ऑक्सिजन आहे, असे म्हणू शकतो. अब्राहम लिंकननी लोकशाहीबाबत ‘लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही’ असे म्हटले होते. महात्मा गांधींनी त्याला एक मापदंड जोडला होता. शंभरपैकी एकाचे मत जरी वेगळे असले, तरी त्याला ते व्यक्त करता आले पाहिजे आणि इतर 99 जणांनी त्याला अभयदान दिले पाहिजे. कारण, तो ते वेगळेपण घेऊन जगत आहे. हा लोकशाहीचा आशय आहे. इंदिरा गांधींनी 19 महिन्यांची आणीबाणी लावली तेव्हा तो आशय हरवला

Open chat
Join our WhatsApp group