”शहराचा सुनियोजित विकास करण्यासाठी हद्दवाढ गरजेची आहे. हद्दीबाहेरील लोकांच्या ज्या काही अडचणी असतील, त्या शंभर टक्के सोडवल्या जातील”, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बहुचर्चित कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी सकारात्मकता दाखवली.
‘शहराकरिता जो-जो विचार केला जाईल, तो टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल’, असे आश्वासनही त्यांनी दिले.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या नूतनीकरणाच्या उद्घाटनानंतर प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर रविवारी दुपारी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम मैदान, दुधाळी येथील सहा एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, करवीरनिवासिनी अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यातील बहुमजली पार्किंग, गोकुळ हॉटेलजवळील मेकॅनिकल पार्किंग, राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधिस्थळाचा उर्वरित विकास, रंकाळा तलावातील आकर्षक संगीत कारंजा, पोलिस कर्मचारी निवासस्थान आदींचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी कळ दाबून केले.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘शेंडा पार्कमधील ७५ एकर जागा उच्च न्यायालयाला देत आहोत. त्याची मोठी इमारत उभी राहणार आहे. त्यानंतर दररोज २०-२५ हजार लोक येतील. आयटी पार्क होत आहे, कन्व्हेशन सेंटरचेही काम सुरू आहे. त्यामुळे शहराला अधिक सुनियोजित करावे लागणार आहे. माझ्यासह एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांचेही कोल्हापूरवर प्रेम आहे. दिवंगत अजित पवार यांचेही विशेष प्रेम होते. कोल्हापूरकरांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिला आहे.
त्यामुळे आता येथे काम केले नाही, तर आमच्यासारखे करंटे कुणीच नाही. त्यामुळे काही काळजी करू नका, यापूर्वीही कोल्हापूरला कमी पडू दिले नाही, पुढेही कमी पडू देणार नाही. कलापूर हे नाव रूढ करण्यात संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा मोठा वाटा आहे. विविध दिग्गज कलाकार, संस्कृतीतील कलाप्रकार येथे पाहिले आहेत. जुने सौंदर्य कायम ठेवून कोल्हापूरकरांचे प्रेम असलेल्या नाट्यगृहाचे काम चांगले झाले आहे. याकडे संपूर्ण महाराष्ट्र मानबिंदू म्हणून पाहतो.
त्याचे ऐतिहासिक वारसामूल्य जपले जाईल. फडणवीस पुढे म्हणाले, ‘सीपीआर’मुळे आरोग्यसेवेत गुणात्मक बदल होतो आहे. छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळात सर्वांत चांगली आरोग्य सेवा येथे दिली होती, त्याच पद्धतीने आता वाटचाल सुरू आहे. अमल, नरके सहकार्य करा : मुश्रीफ ‘कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय प्रगती होणार नाही. शहराची हद्दवाढ होणे आवश्यक आहे. यासाठी आता आमदार अमल महाडिक आणि चंद्रदीप नरके यांनी सहकार्य करावे’, असे म्हणत मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे कान टोचले.


