केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज आणि उद्याचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. प्रकृती अस्वस्थ असल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याची माहिती आहे.
त्यानंतर अमित शहा हुबळी येथून दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अमित शहा यांचा शनिवार आणि रविवार असा दोन दिवसांचा कोल्हापूर दौरा नियोजित होता. हुपरी येथील कल्लाप्पाणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात महालक्ष्मी ग्रीन एनर्जी प्रकल्पाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार होते. या प्रकल्पासाठी ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून, शून्य कचरा आणि ‘वेस्ट टू बेस्ट’ संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प आहे.
हुपरीतील कार्यक्रमासाठी आमदार राहुल आवाडे यांच्याकडून मोठी तयारी करण्यात आली होती. अमित शहा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम भव्य स्वरूपात करण्याचे नियोजन करण्यात आले होते. अमित शहा यांच्या अनुपस्थितीत हुपरीतील कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा आहे. अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याची अधिकृत रूपरेषा यापूर्वी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार २० सप्टेंबरला हुपरीतील जवाहर कारखाना परिसरात प्रकल्पाचे भूमिपूजन नियोजित होते.
