यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक परिणाम हा फळबागांवर झालेला आहे. उत्तर महाराष्ट्रात द्राक्ष बागांचे तर कोकणामध्ये आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हंगामाच्या सुरवातीपासूनच अतिवृष्टी, गारपिट, थंडीचा कडाका आणि आता काढणीच्या दरम्यान झालेली अवकाळी. सर्व काही नुकसानीचे झाल्याने यावर्षी एकूण उत्पादनापैकी केवळ 20 ते 25 टक्केच उत्पादन बागायतदारांच्या पदरी पडणार आहे. फळांच्या राजा म्हणून ओळख असलेल्या हापूसला सबंध देशभरातून मागणी असते. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा खवय्यांना या आंब्याची चव चाखण्यासाठी तब्बल महिनाभराची प्रतिक्षा करावी लागली आहे. असे असले तरी उत्पादनात मोठी घट झाल्याने याचा परिणाम आता दरावर पाहवयास मिळत आहे. आता कुठे बाजारपेठेत हापूसची आवक सुरु झाली आहे. मात्र, वाढत्या दरामुळे ग्राहक याला कसा प्रतिसाद देणार ते पहावे लागणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीचा फटका; इंधनाच्या दरात मोठी वाढ
कोकणात आंब्याचे उत्पादन हे तीन टप्प्यात घेतले जाते. जानेवारी महिन्यापासूनच याची सुरवात होते. पण याच कालावधीपासून सुरु झालेल्या निसर्गाच्या लहरीपणाचा सामना आंबा उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागला होता. सुरवातीला अवकाळीमुळे मोहरला धोका निर्माण झाला तर यातून सावरत असताना पुन्हा गारपिटीशी दोन हात करावे लागले होते. निसर्गाच्या अवकृपेमुळे तीन्हीही टप्प्यातील उत्पादन वेळेत शेतकऱ्यांच्या पदरी पडले नाही. परिणामी अधिकचा खर्च करुनही शेतकऱ्यांचे उद्दीष्ट मात्र, साध्य झाले नाही.
यंदा आंबा बाजारपेठेत दाखल होण्यास वेळ झाला असला तरी मुंबई बाजारपेठेतच त्याचा श्रीगणेशा झाला आहे. प्रतिकूल परस्थितीमध्येही जानेवारी महिन्यापासून मार्चपर्यंत येथील वाशी मार्केट 1 लाख पेट्यांमधून हापूसची आवक झाली आहे. तर 10 हजार पेट्यांची निर्यात ही आखाती देशांमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये दुबई, ओमान आणि कुवेत या देशांचा समावेश आहे.