सातारा जिल्ह्यात गत काही वर्षांमध्ये झालेल्या अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी आता राज्यात हेल्मेटसक्ती केली जाणार आहे. याबाबत राज्य परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी आदेश काढले आहे. याची लवकरच सातारा जिल्ह्यात अंमलबजावणी होणार आहे. यामुळे आता हेल्मेट न घालणार्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग व जिल्हामार्गांसह दुचाकीस्वारांचे अपघात झाले आहेत. यामध्ये हजारो दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी परिवहन आयुक्तांनी कडक धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच राज्यभर हेल्मेट सक्ती केली जाणार आहे. याबाबचे आदेशही काढण्यात आले आहेत.
शासकीय कार्यालयांमध्ये कामासाठी येणारे अधिकारी, कर्मचारी व नागरिक हे विना हेल्मेट दुचाकी चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्वाचे आहे. यासाठी सातारा उपप्रादेशिक कार्यालयामार्फत हेल्मेट वापर करण्यासंबधी प्रबोधनात्मक आणि अंमलबजावणी संबंधी व्यापक मोहिम राबवण्यात येणार आहे.
या मोहिमेसंबंधी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने हेल्मेटचा वापर करण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक व इतर संस्थांना सहभागी करून घ्यावे. विनाहेल्मेट दुचाकी चालवणार्यांवर कारवाई करावी, असे आदेशच परिवहन आयुक्तांनी दिले आहेत.
त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणार्या नागरिकांसह कर्मचारी व अधिकार्यांना हेल्मेटचा वापर करणे आता बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे अडगळीत गेलेल्या हेल्मेटची शोधाशोध नागरिकांना आता करावी लागणार आहे. ज्यांच्याकडे हेल्मेट नाहीत त्यांना आता खरेदी करावी लागणार आहेत. परिवहन आयुक्तांच्या आदेशामुळे दुचाकी चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.