Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरKolhapur : सिल्व्हर ओकवरील आंदोलनाबाबत उदयनराजे भोसलेंची सूचक प्रतिक्रिया!

Kolhapur : सिल्व्हर ओकवरील आंदोलनाबाबत उदयनराजे भोसलेंची सूचक प्रतिक्रिया!

एकीकडे राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या निवासस्थानावर केलेल्या आंदोलनाचा मुद्दा चर्चेत असताना दुसरीकडे कोल्हापूरमधील पोटनिवडणुकीसाठी वातावरण आता तापू लागले आहे. भाजपने कोल्हापुरात आपली ताकद पणाला लावली असताना महाविकास आघाडीकडून देखील पंढरपूर पोटनिवडणुकीचे उट्टे काढण्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर दौऱ्यावर आलेले भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवरून महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी केलेल्या आंदोलनाबाबत उदयनराजे भोसले यांनी यावेळी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. आपण जे कर्म या जन्मी करतो, ते याच जन्मी फेडावे लागते. सगळ्यांना हे लागू होते. अपवाद कुणाचाही नाही. अजून काय बोलणार त्यावर? असे उदयनराजे म्हणाले आहेत.
राज्यातील सत्ताधारी पक्षांपैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर उदयनराजे भोसले यांनी निशाणा साधला. पंचायत राजची संकल्पना हे सांगतात. जी गांधीजींनी तेव्हा मांडली होती. जोपर्यंत सत्तेचे विकेंद्रीकरण होत नाही, तोपर्यंत लोकशाही देशात नांदणार नाही. काय केले काँग्रेस-राष्ट्रवादीने? सत्तेचे केंद्रीकरण केले. मूठभर लोकांच्या हातात सत्ता राहिली आणि बाकीच्यांना त्यांनी सोयीप्रमाणे वापरले. याला गुलामगिरी म्हणायचे नाही, तर काय म्हणायचे? असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्राने याआधी अनेक मुख्यमंत्री बघितले. भाजपकडून देवेंद्र फडणवीसांनी चांगल्या प्रकारे धुरा सांभाळली. त्यावेळी शिवसेना बरोबर होती. मग असे काय घडले की त्यांनी पार चिरफाड करून टाकली, असे उदयनराजे भोसले यावेळी म्हणाले. आज काय अवस्था आहे? कोण भोगत आहे? कुणामुळे? आज जे सत्तेत आहेत, त्यांना ज्यांनी निवडून दिले, त्यांचाच विसर पडला आहे. कारण ते आपली सत्ता टिकवण्याच्याच मागे आहेत. कोण इकडे जाईल का? कोण तिकडे जाईल का? प्रगतीचा विचार येणारच कसा? मग यातून अस्थिरता वाढत गेली, अशा शब्दांत उदयनराजे भोसलेंनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -