दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi HC) एका बलात्कार प्रकरणाच्या खटल्यात महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. लग्नाचे खरे वचन देऊन शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर काही कारणाने लग्न होऊ शकले नाही, तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. एक पुरूष आणि स्त्री दीर्घकाळ संबंधात होते. दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. पण काही कारणाने नाते तुटले आणि लग्न होऊ शकले नाही.
न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी कलम ३७६ (२) (एन) अन्वये एखाद्या पुरुषाला लग्नाच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार केल्याबद्दल दोषी ठरवण्याचा ट्रायल कोर्टाचा निर्णय रद्द ठरवण्यात आला. कोर्टाने सांगितले की, तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार त्या व्यक्तीने मुलीच्या आई-वडिलांना तीन महिने लग्नाला परवानगी देण्यासाठी राजी केले होते. दरम्यान, दोघांमधील शारीरिक संबंधात महिलेची संमती, गैरसमज किंवा भीतीवर आधारित नव्हती.
दोघांचा साखरपुडा झालेला होता. त्यात कुटुंबातील सर्व सदस्य सहभागी झाले होते. यावरून असे दिसून येते की, याचिकाकर्त्याचा संशयीत आरोपीशी लग्न करण्याचा हेतू खरा होता. केवळ संबंध तुटल्यामुळे याचिकाकर्त्याचा संशयीत आरोपीशी लग्न करण्याचा कोणताही हेतू नव्हता असा दावा करता येणार नाही. फिर्यादीने शारीरिक संबंधांना दिलेली संमती चुकीच्या विश्वासावर किंवा भीतीवर आधारित नव्हती, असेही न्यायालयाने यावेळी नमूद केले आहे.
आपल्यावरील आरोप खोटे असून संबंधीत महिलेवर प्रेम होते, असे संशयीत आरोपीने न्यायालयाला सांगितले. शिवाय तिच्यासोबत सेटल होण्याचाही इरादा होता पण हे नाते काही जाचक अटींमुळे संपुष्टात आले. न्यायालयाने संशयीत आरोपीच्या बाजूने गुणवत्तेचे निरीक्षण केले आणि स्पष्ट केले की ‘लग्नाचे खोटे वचन’ आणि ‘लग्न करण्याच्या वचनाचा भंग’ यात फरक आहे.