उन्हाळा सुरू झाला असून तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कडक उन्हामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण आणि त्यामुळे अनेक शरीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. याशिवाय शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी पाण्यासोबतच पोषक पदार्थांचे सेवन करणे देखील आवश्यक असते. त्यामुळे उन्हाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये हे जाणून घेऊया.
लिंबू पाणी : उन्हाळ्यात लिंबूपाण्याचे सेवन केल्याने तुमचा उन्हापासून बचाव होऊ शकतो. याशिवाय यामुळे तुम्हाला आतून ताजेतवाने राहण्यासही मदत होते. लिंबू पाणी वजन कमी करण्यास देखील मदत करते.
नारळ पाणी : उन्हाळ्यात नराळ पाण्याचे सेवन नक्की करावे. नारळाच्या पाण्यामुळे उन्हाळ्यात शरीराला अनेक फायदे होतात. नारळ पाण्याला पोषक तत्वांचे भांडार म्हणतात. उन्हाळ्यात नारळपाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याच्या कमतरतेवर मात करता येते. नारळ पाणी पिल्याने शरीरातील उष्णता आणि पोटातील आम्लाची पातळी कमी होते.
दही : उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळण्यासाठी दही सगळ्यात उत्तम असते. नियमितपणे दह्याचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. दह्यामुळे अन्न पचन होण्यास मदत होते. तुम्ही ताक देखील पिऊ शकता.
हिरव्या भाज्या : उन्हाळ्यात आहारात शक्यतो हिरव्या भाज्यांचा समावेश करावा असा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. हिरव्या भाज्या अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतात. त्यामुळे हंगामी आजारांपासून बचाव होण्यास मदत होते. उन्हाळ्यात आला की कलिंगड, खरबूज, स्ट्रॉबेरी आणि पीच ही फळे बाजारात उपलब्ध असतात. ही फळे खाल्याने तुमच्या शरीरातील उष्णाता कमी होईल. भाज्यांमध्ये काकडी खाल्याने देखील शरीरातील उष्णता कमी होते.
संत्री : उन्हाळ्यात संत्र्याचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. संत्र्याच्या सेवनाने उष्णतेपासून आराम मिळतो आणि शरीर आतून थंड राहते. सत्र्यात 88 टक्के पाणी, व्हिटॅमिन-सी, कॅल्शियम आणि फायबर असते. यामुळे मौसमी आजारांपासून वाचवण्यास मदत होते.