एका निर्दयी आईने आपल्या पोटच्या सहा मुलांना विहिरीत ढकलले. यात सहाही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 5 मुली आणि 1 मुलाचा समावेश आहे. मुलांना मारल्यानंतर महिलेने स्वत: ही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
हृदय पिळवटणारी घटना रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातल्या बिरवाडी गावात घडली आहे. या महिलेने मुलांना का मारलं यामागील कारण अद्याप समोर आले नाही. परंतु पतीच्या दारूच्या त्रासाला कंटाळून महिलेने हे पाऊल उचलल्याची गावात चर्चा सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस (Raigad Police) आणि गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक आमदार भरत गोगावलेही (MLA Bharat Gogavale) घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी निर्दयी आईला ताब्यात घेतल आहे. तर सहाही मुलांचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले आहेत. महिलेचा पतीसोबत सोमवारी सायंकाळी वाद झाला होता. त्यानंतर रात्री 8 वाजेच्या सुमारास महिलेने घराशेजारील विहिरीत पोटच्या सहाही मुलांना फेकले आणि त्यानंतर स्वत:ही उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
महिलेने पतीच्या दारूच्या त्रासाला कंटाळून आपल्या पोटच्या सहा मुलांना विहिरीत फेकले. यात पाण्यात बुडून सहाही मुलांचा मृत्यू झाला. मुलांना मारल्यानंतर महिलेने स्वत:ही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश मिळाले. रश्मी चिखुरी साहनी (वय-10), करिष्मा चिखुरी साहनी (वय-8), रेश्मा चिखुरी साहनी (वय-6), विद्या चिखुरी साहनी (वय-5), शिवराज चिखुरी साहनी (वय-3) आणि राधा चिखुरी साहनी (1.5 वर्ष) अशी मृत मुलांची नावे आहेत.