ताजी बातमी ऑनलाईन टीम
पक्षी व वृक्षांकडून पावसाचे पूर्वसंकेत मिळत असतात. निसर्गाचे निरीक्षण करुन त्यावर आधारित निर्णय जुन्या काळातील लोक घेत असत.सध्या निसर्ग निरीक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. पावसाचे संकेत मिळणारे पक्षी व वृक्षांची माहिती असणे गरजेचे आहे.
पावसाळा जवळ आल्याचे संकेत आफ्रिकेतून आलेले चातक पक्षी सर्वप्रथम देतात. पाऊस अगदी वेळेवर येणार असेल तर चातक पक्ष्यांचे आगमन लवकर होते. जर त्यांचे आगमन लांबले तर पाऊसही लांबणार अशी निरीक्षणे आहेत.चातक पक्षी ‘पिऊ.. पिऊ’ या त्यांच्या सांकेतिक आवाजात ओरडू लागले की पहिल्या पावसाचे दिवस जवळ आले हे हमखास समजले जाते. चातक पक्ष्याप्रमाणेच सृष्टीतील बदलांचे पूर्वसंकेत देणाऱ्या आश्चर्यकारक घटनांचा पावशा पक्षी हा आणखी एक महत्त्वाचा दूत आहे. ‘पेर्ते व्हा’ असे सांगणारा पावशा ओरडू लागला की जुन्या काळी शेतकरी मशागतीची कामे सुरु करत होते.
माळरानावर, शेतांवर काळ्या-पांढऱ्या, अंगावर ठिपके असलेल्या तित्तीर पक्ष्यांचे थवे ‘कोड्यान केको.. कोड्यान केको..’ अशा सांकेतिक स्वरात ओरडू लागले की आता लवकरच पाऊस येणार असे समजतात. जंगलातील माळरानांत या पक्ष्यांचे अस्तित्व फारसे आढळून येत नाही. परंतु मानवी वस्त्यांशेजारच्या माळरानांवर तित्तीरांची गडबड सुरू झाली की हमखास पावसाचे लक्षण समजले जाते.
कावळ्याने मे महिन्याच्या काळात बाभुळ, सावर अशा काटेरी झाडांवर घरटे केले तर पाऊस कमी पडतो आणि आंबा, करंज या वृक्षांवर केले तर त्या वर्षी पाऊस चांगला येतो.कावळ्याने झाडाच्या पूर्व दिशेने घरटे केले तर पाऊस चांगला पडणार. पश्चिमेला केले तर पाऊस सरासरीएवढा पडणार. दक्षिण-उत्तरेला केले तर पाऊस अत्यंत कमी पडणार. आणि झाडाच्या शेंड्यावर केले तर अवर्षणपर्वाची ती नांदी असते. सहसा कावळा झाडाच्या शेंड्यावर घरटे करीत नाही आणि केले तर ती अत्यंत दुर्मीळ घटना असते. यातून दुष्काळाचे अगदी डोळस संकेत मिळू शकतात.
यापेक्षाही मनोरंजक बाब म्हणजे कावळीणीने
अंडी किती घातली यावरूनही जुन्या काळात पावसाचा अंदाज बांधला जात असे. तिने सुमारे चार अंडी दिली तर पाऊस चांगला पडतो. दोन अंडी दिली तर कमी पाऊस. एकच अंडे दिले तर अतिशय कमी. आणि जमिनीवर अंडी दिली तर अभूतपूर्व दुष्काळाचे आगमन ठरलेले असे संकेत जुन्या काळात होते.




