ताजी बातमी ऑनलाईन टीम
इचलकरंजी पासून जवळ असलेल्या चंदुर येथील धनगर समाजातील काही कुटुंबांना जात पंचायतीने बहिष्कृत केल्याच्या घटनेला या गंभीर प्रकाराची पोलिस प्रशासनाने तातडीने याची दखल घेतली. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सायंकाळी बहिष्कृत करण्यात आलेल्या काही कुटुंबांतील प्रतिनिधींची मते जाणून घेतली. लवकरच धनगर समाजातील प्रमुखांशी संवाद साधून याप्रश्नी कायमचा तोडगा काढण्यासाठी गतीने प्रयत्न करू, असे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.
रूकडीपाठोपाठ चंदूर येथील धनगर समाजातील 16 हून अधिक कुटुंबांना जातपंचायतीने बहिष्कृत केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक वाघमोडे यांनी तातडीने त्या कुटुंबातील प्रतिनिधींशी संवाद साधला. भोपाल मंगसुळे, कल्लाप्पा मंगसुळे आदींसह सहा ते सात जणांच्या त्यांनी भावना जाणून घेतल्या.
दोन वर्षांपूर्वी शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडून याबाबत तोडगा काढण्यात आला होता. मात्र, पुन्हा आम्हाला तशीच वागणूक मिळत होती. 50 वर्षांपासून अधिक काळ बहिष्कृत असल्याने अनेक यातना सहन कराव्या लागत असल्यामुळे यातून मार्ग काढावा, अशी आर्त हाक बहिष्कृत कुटुंब प्रमुखांनी यावेळी दिली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी जिल्ह्यात आणखीन किती वर्षे असा अन्याय सहन करायचा, असा सवालही उपस्थित कुटुंबांतील प्रमुखांनी केला. वाघमोडे यांनी लवकरच याबाबत धनगर समाजातील प्रमुखांची बैठक घेऊन हा प्रश्न तातडीने सोडवण्याची ग्वाही दिली. यावेळी चंदूरचे पोलिस पाटील राहुल वाघमोडे उपस्थित होते.