कोल्हापूरकडे येण्यासाठी अथवा देवगडला जाण्यासाठी फोंडा – राधानगरी मार्गे एस. टी. बस नसल्याने राधानगरी, भुदरगड तालुक्यातील प्रवाशांची गैरसोय होत आहे तर फोंडा, राधानगरी मार्गे कोल्हापूर, निपाणी, गडहिंग्लज फेरी सुरु करण्याची मागणी होत आहे. सध्या मात्र राधानगरी मार्गे देवगडला जाण्यासाठी एकही एस. टी. धावत नाही. देवगड आगारातून पुणे, सांगली, तुळजापूर, अक्कलकोट आदी मार्गावर एस. टी. बसेस धावतात; परंतु या बसेस फोंडा, राधानगरी मार्गे न जाता वैभववाडी, गगनबावडा मार्गे जातात.
त्यामुळे देवगड, फोंडामार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कुचंबणा होत आहे. या मार्गावर राधानगरी, भोगावती, मुदाळतिट्टा, निपाणीकडे जाणारे प्रवासी असतात; परंतु या मार्गे थेट एस. टी. नसल्याने नाईलाजाने वडापचा मार्ग शोधावा लागत आहे. तसेच कोकणहून श्री क्षेत्र बाळूमामा मंदिराकडे दर्शनासाठी येणारा मोठा भक्तगण आहे. त्यामुळे राधानगरी, फोंडा मार्गे देवगडकडे जाण्यासाठी व देवगडहून कोल्हापूरला येण्यासाठी एस. टी. बस सुरु करावी, अशी मागणी होत आहे.






