इस्लामपूर येथील जुनेखेड फाट्यानजीक सायकलीवरून घरी निघालेल्या निरंजन सचिन पाटील (वय 9, रा. जाधव गल्ली, इस्लामपूर) याला ट्रकने समोरून धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी घडला. अपघातानंतर ट्रकचालकाने पलायन केले. या अपघाताची नोंद इस्लामपूर पोलिस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रविवारी दुपारी 2.15 वाजण्याच्या सुमारास निरंजन हा सायकलवरून रिंगरोडने घरी जात होता. जुनेखेड फाट्याजवळ समोरून आलेल्या ट्रक (एम.एच.50/ एन-4659) ने निरंजन याच्या सायकलला जोराची धडक दिली. निरंजन हा रस्त्यावर पडला. ट्रकचे मागचे चाक निरंजन याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने ट्रक सोडून पलायन केले. संजय पाटील यांनी पोलिस ठाण्यात वर्दी दिली.