बारामती शहरातील मोरगाव रस्त्यावरील सिकंदरनगर येथे मुलाला जीवे मारण्याची धमकी देत महिलेला झुडपात ओढून नेत तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी रोहीत केशव जगताप (वय २८, रा. कसबा, बारामती) याच्याविरोधात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. जगताप याच्यावर यापूर्वी विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.
संबंधित महिलेने याबाबत फिर्याद दिली. सोमवारी ६ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रोहित जगताप याने पीडित महिलेला, तुझ्या मुलाला जीवे मारतो अशी धमकी देत तिला झुडपात ओढत नेले. आता येथे कोणी नाही, मी तुला पाहिजे तसे वापरणार असे अश्लिल बोलून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिला सोडून दिल्यावर ती कामाच्या ठिकाणी गेली. काही वेळातच त्याने पुन्हा त्या ठिकाणी जात गोंधळ घालत तिला सोबत चल अशी मागणी केली. तिने नकार दिला असता तिच्या घरी जात घराचे कुलुप व दरवाजा तोडून टाकत नुकसान केले.
जगताप याची शहरात मोठी दहशत आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. परंतु या महिलेने कोणतीही भीती न बाळगता पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेत जगताप याला तात्काळ उचलून आणत अटक केली. त्याला बारामती न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली.