ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई ; उमेदवारांबरोबरच नेत्यांचीही धाकधुक वाढविणाऱ्या राज्यसभेच्या चुरशीच्या लढतीत सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. या आखाड्यात त्यांनी आपले प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संजय पवार यांना चितपट करून अस्मान दाखविले. शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत निवडणूक आयोगाने बाद ठरविल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे.
अपेक्षेप्रमाणे भाजपचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, माजी मंत्री अनिल बोंडे, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे संजय राऊत व काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी हे निवडून आले. तब्बल 8 तासांच्या प्रदीर्घ नाट्यानंतर रात्री पावणेदोन वाजता मतमोजणी सुरू झाली.
जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांनी आपली मतपत्रिका अधिकृत प्रतिनिधीशिवाय इतरांना दाखविल्याचा आक्षेप भाजपने घेतला. राज्य निवडणूक आयोगाने हा आक्षेप फेटाळल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागून राज्यसभेची निवडणूकच रद्द करण्याची मागणी केली होती. तर महाविकास आघाडीने रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवार यांनीही निवडणूक नियमांचा भंग केल्यामुळे त्यांचे मत अवैध ठरविण्यात यावे, अशी मागणी केली.