रस्त्यावर वाहन चालवायचे, म्हणजे वाहतूक नियमांची माहिती हवीच.. वाहतूक नियम पायदळी तुडवून वाहन चालवण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई तर होणारच.. वाहतुकीला शिस्त लागावी, त्यातून अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी केंद्र सरकारने मागील काही दिवसांत वाहतूक नियमांत मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत.
काही वेळा आपल्याला नियमांची माहिती नसते, तर काही वेळा आपल्याकडून कळत-नकळत वाहतूक नियमांचे उल्लंघन होते.. अशा वेळी तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. चलानही कापले जाऊ शकते. मोठा गुन्हा केल्यास, तुरुंगवासाचीही शिक्षा होण्याची शक्यता असते.. त्यामुळे प्रवासादरम्यान वाहतूक नियमांची माहिती असायलाच हवी…!!
वाहतूक शाखेच्या अशाच एका नियमाबाबत आज आपण जाणून घेणार आहेत. अनेकांना या नियमाबाबत फारशी माहितीही नसेल, मात्र या नियमाचे उल्लंघन केल्यास, तब्बल 10 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.
नव्या नियमाबाबत…
हा नवा नियम ‘इमर्जन्सी’ वाहनांबाबत आहे.. ‘इमर्जन्सी’ वाहनांमध्ये अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिकांचा समावेश होतो. सध्याच्या वाहतूक नियमांनुसार, कोणत्याही वाहन चालकाने या ‘इमर्जन्सी’ वाहनांना पुढे जाण्यासाठी रस्ता रिकामा करुन देणं आवश्यक आहे. तुमच्या वाहनाच्या मागे एखादं ‘इमर्जन्सी’ वाहन असेल, तर त्याला तात्काळ पुढे जाण्यासाठी रस्ता मोकळा करुन द्यायला हवा. तसे न केल्यास, तुमचे चलान कापले जाऊ शकते. दंडही आकारला जाऊ शकतो.
मोटार वाहन (सुधारणा) कायदा, 2019 अंतर्गत इमर्जन्सी वाहनांना रस्ता न दिल्यास, वाहन चालकाला 10,000 रुपयांपर्यंत दंड केला जाऊ शकतो.. या कलमात अग्निशमन दल, रुग्णवाहिका यांसारख्या ‘इमर्जन्सी’ अथवा आपत्कालीन सेवा देणाऱ्या वाहनांचा समावेश आहे..
खरं तर रस्त्यावर प्रवास करताना, या वाहनांना प्रत्येकाने मार्ग देण्याची गरज असते. कारण, या वाहनांनी वेळेवर पोहोचणं गरजेचं असते. अनेकांच्या जिवाचा प्रश्न असतो.. मात्र, अनेक जण या वाहनांच्या वाजणाऱ्या सायरनकडेही दुर्लक्ष करुन चालत असतात.. मात्र, तसे केल्यास कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे..