मान्सूनच्या प्रतीक्षा (Monsoon Update) अखेर संपली आहे. गोव्याच्या सीमेवर रेंगाळलेला मान्सून मान्सून सिंधुदुर्गात दाखल झाल्याचं हवामान खात्यानं जाहीर केले. शुक्रवारपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली तर रत्नागिरीतही (Ratnagiri) पावसाच्या सरी बरसल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. मुंबईत देखील रात्री जोरदार पावसाने (Mumbai Rain) हजेरी लावली. त्यानंतर पाहाटेपर्यंत पावसाच्या सरी बसरत आहेत. यामुळे काही ठिकाणी लोकल सेवेवर (Local services) परिणाम झाला आहे. दरम्यान कडाक्याच्या उन्हाचा आणि गर्मीचा सामना करत असलेल्या मुंबईकरांना आज थंड वातावरणाचा (Mumbai Weather Today) अनुभव आला.
मुंबईत रात्रीपासूनच विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. आज सकाळी देखील काही ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल आणि उपनगरांमध्ये पाऊस सुरु आहे. या पावसाचा फटका मुंबईची लाईफलाइन असलेल्या लोकल सेवेला बसला आहे. पावसामुळे मध्यं रेल्वेच्या अनेक गाड्या उशिराने धावत आहेत, तर हार्बर मार्गावरही वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. ट्रान्स हार्बरवरील ठाणे ते वाशी सेवा पूर्णत: ठप्प होती. मात्र तांत्रिक कारणामुळे ही सेवा बंद असल्याचे जाहीर करण्यात आले.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
शुक्रवारी पावसाने मुंबई, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात हजेरी लावली. मान्सूनची वाटचाल (weather update) योग्य दिशेने सुरू असून राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट (yellow alert) देण्यात आला आहे. यात कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदूर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्याचा समावेश आहे.