ताजी बातमी ऑनलाईन टीम
एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एमपीएससीची सतत परीक्षा देऊन यश येत नसेल आणि पुन्हा परीक्षा देण्यासाठी वयोमर्याद आणि कमाल संधीचे टेन्शन घेण्याऱ्या विद्यार्थ्यांना आता चिंता करण्याची गरज नाही. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आता परीक्षा देण्यासाठी कमाल संधीची अट राहणार नाही. कारण एमपीएससीने कमाल संधीची मर्यादा रद्द केली आहे. त्यामुळे परीक्षार्थींना पूर्वीप्रमाणेच निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार कितीही वेळा परीक्षा देता येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिकृत ट्विटर अकाऊंटवर यासंबंधिचे ट्वीट करत घोषणा केली आहे. एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर आता वेगवेगळ्या प्रवर्गातील उमेदवारांना त्यांना ठरवून देण्यात आलेल्या वयोमर्यादेत कितीही वेळा एमपीएससीच्या वेगवगेळ्या परीक्षा देता येणार आहेत.