Saturday, May 18, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापुरातून रात्री उशिराच्या रेल्वेगाड्या सुरू करणार

कोल्हापुरातून रात्री उशिराच्या रेल्वेगाड्या सुरू करणार

केंद्र सरकारच्या रेल्वे प्रवासी वाहतूक सुविधा समितीचे सदस्य खासदार छोटूभाई पाटील, कैलास वर्मा, उमादेवी गोताला यांनी गुरुवारी येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसची पाहणी केली. यावेळी स्टेशन व्यवस्थापक विजयकुमार, शिवनाथ बियाणी, जयेश ओसवाल, डॉ. अश्विनी माळकर उपस्थित होते.

कोल्हापुरातून मुंबई, पुणे आणि सोलापूर या मार्गावर रात्री उशिरा धावणाऱ्या रेल्वेगाडय़ा सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही रेल्वे प्रवासी सुविधा समितीने दिली आहे. या समितीचे सदस्य खासदार छोटूभाई पाटील, खासदार कैलास वर्मा, श्रीमती उमादेवी गोताला यांनी गुरूवारी येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसला भेट देवून सुविधा आणि सुरक्षेची पाहणी केली. तसेच रेल्वे अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या.

खासदार छोटूभाई पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे प्रवासी सुविधा समिती गठित करून त्याद्वारे देशातील रेल्वेस्टेशनवरील प्रवासी सुविधा, सुरक्षेची पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार ही समिती अहवाल सादर करते. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनांनुसार रेल्वे विभागामार्फत कार्यवाही केली जाते. आमची समिती पुणे डिव्हिजनमध्ये तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहे. कोल्हापूरसह हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज या ठिकाणी पाहणी, तपासणी केल्यानंतर पुण्याला जाणार आहे.

बंद असलेल्या रेल्वेगाड्या, रेल्वे स्टेशनवरील सुविधांबाबत छोटूभाई पाटील म्हणाले, कोरोनाच्या काळात बंद केलेल्या रेल्वेगाड्यांपैकी 90 टक्के रेल्वे सध्या सुरू आहेत. दहा टक्के बंद आहेत. त्या 1 जुलैपासून सुरू होणार आहेत. कोल्हापुरात मुंबई, पुणे आणि सोलापूरला जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची जी वेळ आहे, ती प्रवाशांना सोयिस्कर नाही. त्यामध्ये बदल करून रात्री उशिरा या रेल्वेगाडय़ा सोडल्या तर सकाळच्या वेळी प्रवासी मुंबई, पुणे, सोलापूरसारख्या शहरात पोहचू शकतील. या संदर्भात मागणीही आहे. त्यानुसार रात्री उशिराच्या वेळी या तिन्ही मार्गावर रेल्वेगाडय़ा सुरू करण्याच्या सूचना केल्या जातील. त्याची अंमलबजावणीही लवकर होईल. कोल्हापूर टर्मिनल या ठिकाणी अद्ययावत सोयी, सुविधा प्रवाशांना मिळाव्यात यासाठी समिती आग्रही आहे. त्यासाठीच आम्ही प्लॅटफॉर्म, एक्स्लेटर (सरकता जिना), लिफ्ट, वेटिंग रूम, पंखे, सीसीटीव्ही, शौचालय आदींची पाहणी केली. आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या, असे छोटूभाई पाटील यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -