शिराळा येथे घरफोडी करणाऱ्या अट्टल तिघा संशयितांना शिराळा पोलिसांनी मध्यप्रदेशमधील धार जिल्ह्यातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सव्वादोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
रमेश केशरसिंह मेहडा (वय 32), महेंद्र केशरसिंह मेहडा (वय 29, दोघे रा. भुरियापुरा, ता. गांधवानी, जि. धार), मनोज जुवानसिंग वास्केल (वय 24 रा. मुहाजा, ता. कुक्षी, जि. धार) अशी संशयितांची नावे आहेत. या गुन्ह्यातील अन्य समरसिंह रतनसिंह भूरिया (रा. भूतिया, ता. गांधवानी, जि. धार) व बुरू वासनिया यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील नलवडे कॉलनीत राहणाऱ्या वनीता परेश पवार यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी पावणेचार लाखांचा ऐवज लंपास केला होता. पाच जूनला मध्यरात्री ही घटना घडली होती. तसेच चोरट्यांनी त्या परिसरातील इतर दुकाने फोडून, दोन मोटारसायकली, मोबाईल असे मिळून जवळपास 3 लाख 85 हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. याबाबत वनीता पवार व मोटारसायकल मालकांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली होती. त्या फिर्यादीनुसार पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार, सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश वाडेकर यांनी या घरफोडी प्रकरणी तपासाची चक्रे गतीने फिरवली. घटनास्थळी पंचनामा करत असताना कर्नाटक एस.टी. महामंडळ व महाराष्ट्र एस. टी. महामंडळाची काही तिकिटे त्यांना सापडली. गुन्हा घडत्यावेळी रात्री बाराच्या दरम्यान येथील उबाळे कुटुंबियांनी घराला लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा कोणीतरी हलवला असल्याचा अलार्म त्यांना अमेरिकेत झाला. याबाबत उबाळे यांनी अमेरिकेतून शिराळा पोलिसांना फोन करून माहिती दिली होती.
त्यानुसार पोलिसांची गाडी नलवडे कॉलनीत गेली. घरफोडीच्या तयारीत असणाऱ्या चोरट्यांना याचा सुगावा लागताच मोबाईलद्वारे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांशी संपर्क साधून पोलिस गाडी आल्याचे सांगितले. काही वेळाने पोलिस गाडी निघून गेल्यावर त्यांनी घरफोडी करून शैलेश गायकवाड व अमन मुल्ला यांची मोटारसायकल चोरून त्यावरूनच पोबारा केला.
तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर त्यात 5 चोरटे असल्याचे दिसून आले. सीसीटीव्ही फुटेज, एस. टी. तिकीट व काही गोपनीय आधुनिक तंत्रज्ञान प्रणालीद्वारे पोलिसांनी तपास केला. मध्यप्रदेश येथील चोरटे असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिस पथकाने मध्यप्रदेश येथून तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर या गुन्ह्यातील समरसिंह रतनसिंह भूरिया (रा. भूतिया, ता. गांधवानी, जि. धार) व बुरू वासनिया या दोघांचा अद्याप शोध घेणे सुरू आहे. अटक केलेल्या तिघा संशयितांना शिराळा न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.




