सांगली, मिरज शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात छोटा-मोठा व्यापार करून उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र यातील अनेकांकडे पुरेसे भांडवल नसल्याने सावकारांच्या जाळ्यात ते अडकले आहेत. यामध्ये व्हाईट कॉलरचा मोठा सहभाग असल्याची जोरदार चर्चा आहे.
शहरात भाजी, फळ विक्रेते, हातगाडी व्यावसायिक यांची संख्या मोठी आहे. दिवसभर होणाऱ्या व्यवसायातून या व्यावसायिकांचा उदरनिर्वाह चालतो. ग्रामीण भागातून अनेक विक्रेते उदरनिर्वाह करण्यासाठी शहरात आले आहेत. मात्र अनेकांकडे पुरेसे भांडवल नाही. याचाच गैरफायदा घेऊन सावकार त्यांना दिवसावर व्याजाने पैसे देत आहेत. एक हजार रुपयांना दिवसाला शंभर रुपये व्याज आकारले जाते. आदल्या रात्री पैसे दिले जातात दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत व्याजासहित मूळ रक्कम सावकारांना द्यावी लागते, अन्यथा व्याज वाढवण्यात येते. सांगली, मिरज शहरात यातून दररोज लाखों रुपयांची उलाढाल होत आहे.
काही मोठ्या व्यापाऱ्यांना भिशींतून आठवड्यावर पैसे दिले जातात. त्याची आकारणी 20 ते 30 टक्के आहे. एखाद्या आठवड्यात हप्ता चुकला तर चक्रव्याज लावण्यात येते. समजा 10 हजार ही मूळ कर्जाची रक्कम असेल आणि 4 ते 5 हप्ते थकले तर ती रक्कम 50 ते 60 हजार रुपयांच्या घरात जाते. कापड पेड, हरभट रोड, मारुती रोड, सांगली फळ मार्केट यार्ड, मार्केट यार्ड येथील अनेक व्यापाऱ्यांना भिशींमार्फत कर्ज देण्यात आल्याची चर्चा आहे. वसुलीसाठी गुंडाची नेमणूक करण्यात आली आहे.