जळगाव (Jalgaon news) येथून जवळच असलेल्या नशिराबाद (Nashirabad) गावाजवळ बुधवारी सकाळी 7:30 वाजता भीषण तिहेरी अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार तर 6 जण जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, अपघातात पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर (Nagapur Mumbai Highway) वाहतूककोंडी होत गाड्यांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या.
जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील फैजपूर येथील बाजारात विक्रीसाठी नशिराबाद येथून एमएच- 43 एडी – 051 क्रमांकाच्या बोलेरो पीकअप वाहनातून बकर्या नेल्या जात होत्या. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याच्या पुढे असणार्या उड्डाणपुलाजवळ भुसावळकडून भरधाव येणाऱ्या एमएच- 09 एचजी- 9521 क्रमांकाच्या ट्रकने बकऱ्या घेऊन जाणाऱ्या बोलेरो पीकअपला समोरून जबरदस्त धडक दिली. त्यानंतर हाच ट्रक अजून एका वाहनाला धडकला. या विचित्र अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
नागरिकांनी घेतली धाव
या भीषण तिहेरी अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळतच नशिराबाद येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. जखमींना तात्काळ जवळच असलेल्या डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले. या ठिकाणी जखमींवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी ही घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केले. तसेच अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला लावून वाहतूक मोकळी केली. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे महामार्गावर गाड्यांच्या लांबच लाब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या.