ताजी बातमी ऑनलाईन टीम
आता रणांगण जिल्हा परिषद आणि महापालिका : चौरंगी लढतीचे संकेत
महाविकास आघाडीच्या निमित्ताने जिह्यात भाजप विरुध्द काँग्रेसराष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष अशी राजकारणाची पक्षीय विभागणी झाली. आतापर्यंतच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात दंड थोपटणारे नेते एकाच व्यासपीठावर दिसले.
राज्यातील खांदेपालटानंतर येऊ घातलेली महापालिका निवडणूक चौरंगी होण्याचे संकेत आहेत. निवडणुकीनंतरच महाविकास आघाडी सभागृहात अस्तित्वात येईल. दरम्यान, राजकारणाची हवा बदलत राहणार आहे. सरमिसळ आणि वेगळेपण यामुळे कोल्हापूरच्या राजकारणाची खिचडी होईल. गेल्या काही वर्षातील यश हे सूज किंवा फुगवटा नसून शतप्रतिशत पक्षीय ताकद होती, हे दाखवण्याचे मोठे आव्हान भाजप, शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसपुढे आहे. भविष्यात आघाडीच्या निमित्ताने तयार झालेली समिकरणे घडणार की बिघडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
शिवसैनिक भावनेच्या लाटेवर स्वार
कोल्हापूर शहर उत्तर, करवीर, हातकणंगले, शिरोळ, राधानगरी भुदरगड, शाहूवाडी-पन्हाळा आदी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा प्रभाव आहे. कोल्हापुरातील मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर हे मंत्री एकनाथ शिंदे गटात गेले. राज्यातील या बंडाळीनंतर जिह्यातील शिवसैनिक स्तब्ध आहे. जिल्हा परिषद, महापालिका, गोकुळ आणि जिल्हा बँकेत शिवसेना दोन्ही काँग्रेसच्या साथीने सत्तेत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला जिह्यात स्वतंत्र अस्तित्व दाखवण्यास वाव आहे. महापालिका निवडणूक क्षेत्रात क्षीरसागरांची पोकळी भरुन काढावी लागेल. पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर अन्याय झाल्याची भावना सामान्य शिवसैनिकांत आहे. शिवसेना सध्या तरी भावनिक लाटेवर स्वार असून येत्या निवडणुकीत ती कॅश करण्याचा प्रयत्न राहील.
भाजप : कमळ चिन्हाला प्राधान्य, पक्षीय युतीपेक्षा मात्तब्बर उमेदवारांवर लक्ष. काँग्रेस : भाजप सोडून कोणाबरोबरही युती. राष्ट्रवादी : स्थानिक पातळीवर आघाडीचा निर्णय. शिवसेना : भाजपला रोखणे हाच उद्देश. ताराराणी : भाजप कमी पडेल तिथे उमेदवार. जनसुराज्यशक्ती : भाजपसोबत. स्वाभिमानी : महाविकास आणि भाजपला योग्य अंतरावर ठेवण्याकडे कल.