Friday, August 1, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : पंचगंगा, कृष्णा काठावरील केळी आखाती देशात

कोल्हापूर : पंचगंगा, कृष्णा काठावरील केळी आखाती देशात

महापूर, कोरोनाच्या संकटानंतर शिरोळ तालुक्यात शेतीचा ट्रेंड बदलू लागला आहे. ऊसासह फुल, भाजीपाला पिकासाठी प्रसिद्ध असणारा शिरोळ तालुका आता फळ लागवडीकडे वळत आहे. येथील पंचगंगा, कृष्णा काठावर पिकणारी केळी आता आखाती देशात पोहचू लागली आहेत. तालुक्यात सुमारे बाराशे एकरवर केळी पिकाची लागवड केली आहे. सध्या केळीला दरही चांगला मिळत असल्याने वर्षाकाठी एकरी चार ते पाच लाख रुपये उत्पन्न बळीराजाच्या पदरात पडत आहे. शिरोळ तालुक्यातील हे चित्र पाहता ऊस पिकाला फळशेतीचा पर्याय उपलब्ध होवू लागला आहे.

जिल्हय़ात एकीकडे ऊस पिक प्राधान्याने घेतले जात असले तरी शिरोळ तालुका मात्र पहिल्यापासूनच ऊसासोबत भाजीपाला आणि फुल शेतीसाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यात विशेषतः गुलाब फुलांची शेती मोठय़ाप्रमाणात केली जायची. येथील गुलाब फुलांना परदेशातही मागणी होती. मात्र कोरोना संकट काळात सार्वजनिक कार्यक्रम थांबल्याने येथील फुलांना असणारी मागणीही थांबली. त्यामुळे येथील फुल उत्पादक शेतकरी याकाळात पुरता उद्धवस्त झाल. फुलशेतीमधून मिळणारे उत्पन्न थांबल्याने शेतकरी अन्य पर्याय शोधू लागला. यामध्ये केळीच्या लागवडीचा पर्याय उपलब्ध झाला.

मात्र कोरोना सोबतच आलेल्या भीषण महापुराच्या संकटात केळीच्या लागवडीमध्येही मोठे नुकसान झाले. यानंतर मात्र बाजरपेठ स्थिरस्थावर होवू लागल्याने येथील केळीच्या फळबागेला अच्छे दिन आले. सध्या दरही चांगला असल्याने केळी उत्पादक शेतकरयाला समाधानकारक उत्पन्न मिळत आहे.

कांदेबाग, मृगबाग दोन कालावधीत लागवड केळी पिकाची कांदेबाग आणि मृगबाग अशा दोन कालावधीमध्ये लागवड केली जाते. कांदेबागचा लागवड कालावधी जानेवारी व फेब्रुवारी आणि मृगबागचा लागवड कालावधी मे ते जूनच्या दरम्यान केली जाते. टिशू कल्चर रोपे आणि कंद लागवड अशा दोन पद्धतीने केळी पिकाची लागवड केली जाते. केळीच्या शेतीसाठी टिब . सिंचनचा वापर केला जात आहे.

एकरी 30 ते 35 टन उत्पादन केळीच्या शेतीमध्ये सात बाय पाच आणि पाच बाय सहा अशा अंतरावर केळी रोपांची लावण केली जाते. सात बाय पाच नुसार एकरी बाराशे तर पाच बाय सहा नुसार रोपे लावल्यास एकरी चौदाशे रोपांची लागवड केली जाते. यामधून एकरी 30 ते 35 टन केळीचे उत्पादन मिळते. तर देशी केळींचे 20 ते 25 टन उत्पन्न मिळते.

वर्षाकाठी चार ते पाच लाख उत्पन्न केळीचे टिशू कल्चरचे एक रोप साधारणतः चौदा रुपयांना मिळते. देशी, जी-नाईन, वसई, महालक्ष्मी अशा जातींच्या रोपांची लागण केली जाते. यामध्ये लागणचा कालावधी 12 महिने तर खोडव्याचा कालावधी दहा महिन्यांचा आहे. सध्या केळीला देशातंर्गत 16 हजार रुपये तर एक्सपोर्टला 18 हजार रुपये टनाला दर मिळत आहे. त्यामुळे केळीची लागवड करणारया शेतकरयाला वर्षाकाठी चार ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.

शिरोळ तालुक्यात पिकणाऱ्या केळींची काही खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून आखात देशात निर्यात केली जात आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, गोवा, रत्नागिरीसह कोकणातुन येथील केळीस मागणी आहे.

ऊस पिकाला फळशेतीचा पर्याय राज्यातील खानदेशासह पश्चिम महाराष्ट्रात केळीचे पिक प्राधान्याने घेतले जाते. जिल्हय़ातही शिरोळ तालुक्यासह नदीकाठी सिंचनाचे सुविधा असलेल्या ठिकाणी केळी पिकाची लागवड केली जाते. सध्या बाजारपेठेत केळीचा दर चांगल्या प्रमाणात टिकून आहे. राज्यात ऊसाच्या अतिरिक्त उत्पादनाचा प्रश्न निर्माण होत असताना, ऊस पट्टय़ातील शेतकरयांनी केळी या फळ पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहण्यास हरकत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -