ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर ; जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर वाढला. दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले. जोरदार पावसाने पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यासह पाच बंधारे पाण्याखाली गेले. यामुळे पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांची संख्या सात झाली. कोल्हापूर-खारेपाटण मार्गावर भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. बर्की (ता. शाहूवाडी) येथे अडकलेल्या 80 पर्यटकांची सुटका करण्यात आली.
हवामान विभागाने शुक्रवार, दि. 8 पर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दक्षतेचे आदेश दिले. कोल्हापूर शहरात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 21 मि.मी.पावसाची नोंद झाली.
मान्सूनच्या आगमनानंतर प्रथमच सोमवारी शिरोळ आणि हातकणंगले तालुका वगळता जिल्ह्याच्या बहुतांशी भागांत दमदार पाऊस झाला. दुपारी बाराच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाचा जोर सायंकाळपर्यंत कायम होता. काही काळ मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्याच्या धरण क्षेत्रांत पावसाचा जोर अधिक होता. पावसाने शासकीय कार्यालये ओस पडली होती. आठवड्याचा पहिला दिवस असूनही तुलनेने गर्दी कमीच होती.