ताजी बातमी ऑनलाईन टीम
राधानगरी : कसबा तारळे (ता. राधानगरी) येथे दारू पिऊन वाटणी मागत असल्याच्या कारणावरून सख्ख्या भावनेच आपल्या भावाच्या डोक्यात लाकडी ओंडका घालून त्याचा खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. प्रकाश विठ्ठल पाटील (वय 38) असे मृताचे नाव आहे. संशयित धोंडिराम विठ्ठल पाटील याला इचलकरंजी येथून ताब्यात घेतले आहे. चार दिवसांनी ही घटना उघडकीस आली. राधानगरी पोलिस ठाण्यात मृताच्या चुलतभावाने तक्रार दाखल केली आहे.
प्रकाश हा कामानिमित्त कागल येथे राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते. घटना घडण्याच्या दोन दिवस अगोदर तो गावी आला होता. गुरुवारी (दि. 30) त्याचा दारूच्या नशेत भाऊ धोंडिराम याच्याबरोबर मालमत्तेच्या वाटणीवरून वाद झाला.
यावेळी रागाच्या भरात धोंडिरामने प्रकाशच्या डोक्यात लाकडी ओंडका घातला. यामध्ये तो जागीच ठार झाला. त्यानंतर धोंडिरामने घराला बाहेरून कुलूप लावून इचलकरंजी गाठले. रविवारी घराच्या बाजूला असलेल्या प्रकाशचा चुलतभाऊ महादेव दादू पाटील यांना घरातून वास येत असल्याने त्यांनी पोलिसांत माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.