ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर/कडगाव : जनावरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलाने बुधवारी सकाळी जीवघेणा हल्ला केला. यामध्ये प्रकाश महादेव भालेकर (वय 46) जखमी झाले आहेत. भुदरगड तालुक्यातील तांब्याचीवाडी परिसरातील जंगल क्षेत्रात हा प्रकार घडला. जीवाच्या आकांताने शेतकऱ्याने फोडलेल्या हंबरड्यामुळे धावत आलेल्या जनावरांनी प्रतिहल्ला करून अस्वलाला पिटाळून लावल्याने मालकाचे प्राण वाचले. झटापटीत अस्वलाने म्हशीवरही हल्ला केला.
तांब्याचीवाडीसह सिद्धाचा डोंगर हा परिसर जंगलपट्ट्यात येतो. सकाळी 10 वाजता भालेकर जनावरांना चारण्यासाठी या परिसरात आले होते. दाटीवाटीने वाढलेल्या झाडीतून आलेल्या आणि पूर्ण वाढ झालेल्या अस्वलाने मागील बाजूने भालेकर यांना घेरले. अस्वलाने हल्ला करताच भालेकर यांनी त्याच्यावर काठीने प्रहार केला. मात्र, तो निष्फळ ठरला. अस्वलाने भालेकर यांच्या हातासह शरीरावर जोरात चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
भालेकर यांना तत्काळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे तांब्याचीवाडी, सिद्धाचा डोंगर परिसरातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे.