सीएनजी बायोगॅस प्रकल्प उभारणीच्या आमिषाने जमीनमालक, डेपोधारक, ट्रॅक्टरधारकांसह शेतकर्यांची 68 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक (fraud) केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात बुधवारी 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूर, राशिवडे बुद्रुक (ता. राधानगरी) व बेळगाव जिल्ह्यातील संशयितांचा समावेश आहे.
स्टार अॅग्रो तसेच स्टार बिझनेस अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कार्यालयात फेब्रुवारी 2022 पासून आजअखेरपर्यंतच्या काळात फसवणुकीचा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
राहुल तानाजी कांबळे, आरती बलभीम कांबळे (रा. राशिवडे बुद्रुक, ता. राधानगरी), मंजुनाथ हिरेमठ, रवींद्र हिरेमठ (रा. बैलहोंगल, जि. बेळगाव), सचिन विभुते व शिवाजी विभुते (रा. कोते, ता. राधानगरी), ओंकार मोरे (रा. टोप संभापूर, ता. हातकणंगले), मकरंद सूर्यवंशी, विक्रम भागोजी, गजानन परीट (रा. गजानननगर, मैत्री पार्क, मंगळवार पेठ, कोल्हापूर), गजानन कांबळे (रा. शेळकेवाडी, ता. राधानगरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
संशयितांनी कोते (ता. राधानगरी) येथे सीएनजी बायोगॅस प्रकल्प सुरू करण्यासाठी फिर्यादी राजू कवाळे (वय 52, रा. राजारामपुरी, दुसरी गल्ली) यांच्याकडून गट नंबर 529 क्षेत्र 6.5 एकर शेतजमीन भाड्याने घेतली होती. त्यासाठी वार्षिक 4 लाख रुपये भाडे निश्चित करण्यात आले होते. प्रकल्पातील डेपो घेण्यासाठी तसेच शेणापासून लाकूड बनविण्याचे मशिन घेण्याकरिता गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. त्यामधील डेपोधारकांना प्रत्येक टन कच्च्या मालामागे अडीचशे रुपये परतावा देण्यात येईल, असे सांगण्यात आले.
शेणापासून लाकूड बनविण्याच्या मशिनधारकाला प्रतिमहिना 17 ते 20 हजार रुपयांचा परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले. एकूण 180 ट्रॅक्टरधारकांना प्रत्येकी 11 हजार रुपये असे एकूण 19 लाख 80 हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडण्यात आले. या सर्वांना प्रत्येक दिवशी 1 हजार 350 रुपयांचा परतावा देण्याचेही आमिष दाखविण्यात आले.
शेणापासून लाकूड बनविण्याच्या मशिनधारकाला प्रतिमहिना 17 ते 20 हजार रुपयांचा परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले. एकूण 180 ट्रॅक्टरधारकांना प्रत्येकी 11 हजार रुपये असे एकूण 19 लाख 80 हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडण्यात आले. या सर्वांना प्रत्येक दिवशी 1 हजार 350 रुपयांचा परतावा देण्याचेही आमिष दाखविण्यात आले.
फिर्यादी राजू कवाळे यांचे एकूण 6.5 एकर शेतजमिनीचे नुकसान करून डेपोधारकांचे व शेणापासून लाकूड बनविण्याचे मशिन खरेदी करणार्यांची व ट्रॅक्टरने काम करणार्यांची एकूण 68 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक (fraud) केल्याचे म्हटले आहे. पोलिस निरीक्षक राजेश गवळी, सहायक निरीक्षक सुनीता शेळके गुन्ह्याचा तपास करीत आहेत.संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.