मिरज तालुक्यातील बामणोली येथे माहेरून पैसे घेऊन ये असा तगादा लावत पतीने पत्नीला केलेल्या हाणामारीत तिचा मृत्यू झाला. सुनंदा कुमार जाधव (वय 30 रा. दत्तनगर, बामणोली) असे मयत विवाहितेचे नाव आहे. सदरची घटना बुधवारी रात्री दहाच्या दरम्यान घडली. पोलिसांनी पती कुमार भीमराव जाधव (वय 38)याला अटक केली असून कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, जाधव कुटुंबीय हे बामनोली येथे भाड्याच्या खोलीत राहतात. संशयित आरोपी जाधव यास तीन मुली आहेत. पत्नी सुनंदासोबत त्याचे नेहमीच वाद होत होते. पत्नीने माहेरून पैसे आणावेत यासाठी तो वारंवार तिला बांबूने मारहाण करीत होता. बुधवारी रात्री दसऱ्या दिवशी त्यांच्यातील वाद विकोपाला गेला.
दोन मुली नवरात्र उत्सवानिमित्त बाहेर गेल्याने पती-पत्नी व लहान मुलगी हे घरी होते. किरकोळ वादाचे रूपांतर कडाक्याच्या भांडणात झाले व कुमारने तेथेच पडलेल्या बांबूने पत्नीला मारहाण केली. पत्नीने देखील माहेरून पैसे आणणार नाही असे खडसावून सांगत प्रतिकार केला. मात्र कुमारने सुनंदाच्या शरीरावर बांबूने अनेक वर्मी घाव घातल्याने तिच्या शरीरातून रक्तस्त्राव सुरू झाला. अशा अवस्थेत कुमारने सुनंदास सांगली सिविल येथे दाखल केले मात्र डॉक्टरांनी ती मृत असल्याचे घोषित केले. सदर घटनेची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली. मिरज शहर पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर व कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी घटनेचा पंचनामा करीत लागलीच आरोपी कुमार जाधव यास ताब्यात घेतले.