ताजी बातमी ऑनलाईन टीम
बाळासाहेब ठाकरेंच्या काळात ठाकरे घराण्यात बाळासाहेब ठाकरे म्हणायची ती पूर्व दिशा असायची. हे घराणे महाराष्ट्रातील सर्वात शक्तिशाली कुटुंब मानले जात होते, परंतु कालांतराने या कुटुंबात सुरू झालेली वितुष्ट आणि विसंवाद चव्हाट्यावर आला आहे. विशेषतः उद्धव ठाकरे सरकार पडल्यानंतर कौटुंबिक कलहाच्या खुणा आता उघडपणे दिसू लागल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या विरोधात त्यांचे मोठे भाऊच नाही, तर पुतण्यानेही जोरदार मुसंडी मारली आहे. स्मिता ठाकरे यांनी राहिलेली कसर पूर्ण करुन टाकली.
बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मीनाताई यांना बिंदू माधव, जयदेव आणि उद्धव अशी तीन मुले आहेत. बिंदू माधव हा ज्येष्ठ पुत्र होता. 20 एप्रिल 1996 रोजी वयाच्या 42 व्या वर्षी लोणावळ्याहून मुंबईला परतत असताना कार अपघातात त्यांचे निधन झाले. त्यांना राजकारणात अजिबात रस नव्हता. आधी त्यांनी व्हिडिओ कंपनी उघडली आणि नंतर चित्रपट निर्मिती सुरू केली.
बिंदू माधव यांचा अपघाती मृत्यू झाला, तेव्हा बाळासाहेब ठाकरे पूर्णपणे तुटले होते. त्या अपघातात बिंदुमाधव यांचा मुलगा निहार बचावला. आता तो 31 वर्षांचा आहे. निहार हा व्यवसायाने वकील आहे, पण त्याचे काका उद्धव यांच्याशी त्याचे जमत नाही. राजकारणापासून तो देखील दूर राहतो, पण नुकतेच त्यांनी काका उद्धव यांच्या विरोधात जाऊन एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास व्यक्त केला.
निहार हा व्यवसायाने वकील आहे. त्यांचे लग्न भाजपचे प्रदेश नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीशी झाले आहे. अलीकडेच एका सभेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंचावर बसलेले दिसले. तेव्हा निहार पहिल्यांदाच चर्चेत आले. शिंदे यांच्यासोबत आल्याने त्यांचे काका उद्धव यांच्याशी खोलवर मतभेद असल्याचे स्पष्ट होत आहे.
दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी मेळावे घेतले. शिंदे यांच्या सभेत उद्धव यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे प्रदीर्घ कालावधीनंतर राजकीय व्यासपीठावर आल्याने लोकांना आश्चर्य वाटले. शिंदे यांच्यासोबत येण्यावरून त्यांचे धाकट्या भावाशी संबंध अजिबात चांगले नसल्याचे स्पष्ट होते. मात्र, जयदेव यांचीही स्वतःची कथा आहे. वडिलांशी असलेले मतभेद सर्वश्रुत आहेत. पिता बाळासाहेब ठाकरे यांनी मुखपत्रातून त्यांना मुलगा नव्हे, तर शोकांतिका म्हणून फटकारले होते.



