ताजी बातमी ऑनलाईन टीम
आरोग्य तपासणीच्या नावाखाली नोंदीत बांधकाम कामगारांची तपासणी करून रिपोर्ट न देणारया कंपनीचा ठेका रद्द करा व बांधकाम कामगारांची बंद केलेली मेडिक्लेम योजना सुरू करा. बांधकाम कामगारांना 20 हजार रूपये दिवाळी बोनस द्या, या मागण्यांसाठी लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्या वतीने दसरा चौक ते सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दिवाळीच्या तोंडावर पडत्या पावसात बांधकाम कामगार रस्त्यावर उतरले होते.
दसरा चौक, आईसाहेब महाराज पुतळा, लक्ष्मीपुरी, फोर्ड कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, शाहुपुरीमार्गे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय असा मोर्चाचा मार्ग होता. लाल किंवा पांढरा ड्रेस, लाल टोपी, हातात लाल झेंडा घेवून कामगार मोर्चात सहभागी झाले होते. जवळपास दीड ते दोन हजार कामगार सहभागी झाल्याने मोर्चाच्या मार्गावरील वाहतुक जागच्याजागी थांबली होती.
पडत्या पावसातही कामगार आपल्या मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात जीवाच्या अकांताने घोषाणाबाजी करीत आपल्या मागण्यांसाठी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत होते. हा मोर्चा संघटनेचे अध्यक्ष भरमा कांबळे, जनरल सेक्रेटरी शिवाजी मगदूम यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. निवेदनात म्हटले आहे, घरबांधणी करता साडेपाच लाख रूपये अनुदान द्या व घरकुल योजनेच्या अटी व स्टेप कमी करून घरकुल योजनेचे अर्ज तातडीने मंजूर करा. 18 ते 60 वयोगटातील कामगारांना नैसर्गिक मृत्यू लाभ पाच लाख रूपये व अपघाती मृत्यू लाभ दहा लाख रूपये द्या. निवृत्तीचे वय 60 ऐवजी 65 करा व कामगारांना पाच हजार रूपये पेन्शन द्या. बोगस बांधकाम कामगार नोंदणीला आळा घाला व क्षमतेपेक्षा जास्त दाखले देणारया इंजिनिअरवर कारवाई करा, एजंटांचा सुळसुळाट थांबवा, नोंदणीकृत कामगार संघटनेला प्राधान्य द्या.