मोहरे येथील महादेवनगर (चांदोली वसाहत) परिसरातील शानाबाई शंकर सराफदार (वय 48) ही महिला मळणी मशीममध्ये सापडून जागीच ठार झाली. ही घटना मोहरे येथे सोमवारी सायंकाळी घडली.
याबाबतची माहिती अशी, मोहरे ता पन्हाळा येथील खंडोबा देवालय परिसरातील बावणे यांच्या शेतात मोहरे येथील मळणी मशीनने सोयाबीनची मळणी सुरू होती. सोयाबीन कापून व गोळा करून मळणी मशीनवर टाकण्याच्या कामासाठी महादेवनगर वसाहतमधील महिलांसह शानाबाई रोजंदारीवर गेली होती.
सोयाबीन मळणी मशीनमध्ये टाकत असताना टॅक्टर व मशीनच्यामध्ये असणाऱ्या शाप्टमध्ये त्यांच्या साडीचा पदर अडकल्याने त्या शाप्टबरोबर गुंडाळल्या गेल्या. पोटात व पाठीत मशीनचा गज घुसून शाप्टबरोबर फिरल्याने त्यांच्या शरीराच्या चिंधडय़ा झाल्या. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत कोडोली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते. शानाबाई यांच्या पाश्चात पती, सासू, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.