ताजी बातमी ऑनलाईन टीम
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. १९ रोजी रात्री १० च्या सुमारास उघडकीस आली. श्रीमती नंदा नामदेव जोशी (वय ४९) असे मृत महिलेचे नांव असून, चंदगड आणि कोल्हापूर पोलिसांचे पथक तपासात गुंतले आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी, श्रीमती नंदा जोशी ही आपल्या मुलांसह वरव्यातील घरात रहातात. बुधवारी त्या आपल्या मुलासह पाहुण्यांच्या गावी एका समारंभासाठी गेल्या होत्या. समारंभाहून सायंकाळी घरी आल्यानंतर दोघेही जनावरांची देखभाल करण्यात व्यस्त होते. त्यानंतर मुलगा जनावरांचे दूध काढून दूध संस्थेला घेऊन गेला. मुलगा दूध घालून आल्यानंतर घरी आला असता आई घरात नसल्याचे निदर्शनास आले. सर्वत्र शोधाशोध केली असता घराच्या पाठीमागील बाजूस १० च्या सुमारास नंदा यांचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह निदर्शनास आला. त्यानंतर मुलाने या घटनेची माहिती स्थानिकांसह नातेवाईकांना दिली. घटनेची माहिती समजताच कोल्हापूर येथील पोलिसांचे पथक रात्री १ च्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर चंदगड पोलीस आणि कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला. मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. नंदा यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, जावई, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. कोणाशीही कसलेच वैर नसताना एका गरिब कुटुंबावर ओढवलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.