ताजी बातमी ऑनलाईन टीम
देशात सध्या दिवाळी पर्व सुरु आहे. यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून शेअर बाजारावर देखील याचा परिणाम दिसून आला. हिंदू संवत वर्ष 2079 च्या सुरुवातीच्या निमित्ताने, बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी विशेष एक तासाच्या मुहूर्त व्यापारात वाढीसह बंद झाले. उद्या म्हणजे 26 ऑक्टोबर रोजी दिवाळी बलिप्रतिपदेनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे.
हिंदू धर्मात दिवाळी सणाला महत्त्व आहे. या उत्सवादरम्यान विविध सण साजरे होता. त्यातील एक म्हणजे बलिप्रतिप्रदा हा दिवस पाडवा म्हणून देखील साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तापैकी महत्त्वाचा असा हा एक दिवस आहे. दरम्यान, शेअर बाजारात दिवाळीच्या निमित्ताने देशांतर्गत बाजारपेठेत एका तासाचा मुहूर्त व्यापार केला जातो. यंदाच्या या बाजारात उसळी बघावयास मिळाली. मुहूर्तच्या व्यापारात शेअर बाजार सलग सातव्या सत्रात वधारल्याचे दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा निर्देशांक 524.51 अंकांच्या वाढीसह 59,831.66 वर बंद झाला. त्याचप्रमाणे, विस्तृत शेअर-आधारित NSE निफ्टी निर्देशांक 154.45 अंकांनी किंवा 0.88 टक्क्यांनी वाढून 17730.75 वर बंद झाला.
या शेअरमध्ये झाली वाढ
दरम्यान, दिवाळीच्या या पार्श्वभूमीवर शेअर मार्केटमध्ये उसळी बघावयास मिळाली. यात आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी), नेस्ले इंडिया, एचडीएफसी बँक, एसबीआय, एचडीएफसी आणि डॉ. रेड्डीज हे शेअर्स सर्वाधिक वाढले. या समभागांनी 2.92 टक्क्यांपर्यंत उसळी घेतली. एफएमसीजी वगळता, बीएसईच्या सर्व विभागातील निर्देशांक उसळी घेत बंद झाले. तर बीएसईचा स्मॉल कॅप निर्देशांक 0.99 टक्क्यांनी व मिड कॅप निर्देशांक 0.50 टक्क्यांनी वधारून बंद झाला.