कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून दिवसाला खुनाच्या घटना होत असल्याचे समोर येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गुन्हेगारीत वाढ होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मागच्या काही दिवसांपूर्वी तिहेरी हत्याकांडाची माहिती ताजी असतानाच कोल्हापुरात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राला जेवायला नेत त्याच्या धारधार शस्त्राने वार करून खून केल्याने कोल्हापूर हादरले आहे. दरम्यान हा खून कोणत्या कारणावरून झाला याबाबत अद्यापही कारण समजू शकले नाही.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्याच्या प्रयाग चिखली गावात मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे. काल (दि.08) रात्री वडणगे फाटा येथे खून झाल्याची घटना समोर आली. किरण दिनकर नाईक (वय 38) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खुनानंतर स्वतः आरोपी पोलिसात हजर झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. खुनाच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे. दरम्यान या खुनाच्या घटनेने चिखली परिसर हादरून गेला आहे.
किरण नाईक हा शेतकरी कुटुंबात वाढल्याने तो अतिशय शांत म्हणून ओळखला जात होता. काल, मंगळवारी रात्री तो मित्रांसोबत गेला होता. या दरम्यान अचानक कोणालाही याची खबर नसताना एकाने किरणवर तिक्ष्ण हत्याराने खून केला. खुनानंतर स्वतः आरोपी पोलिसात हजर झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. खुनाची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी किरणचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
घटनेची माहिती पोलिसांनी किरणच्या कुटुंबीयांना दिली. किरणच्या पश्चात आई-वडील भाऊ असा परिवार आहे. किरण अविवाहित होता. किरण हा स्वभावाने शांत होता. खुनाच्या प्रकारानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असून काही धागेदोरे हाती लागतात का याचा शोध घेत आहे. मात्र, अद्याप खुनाचे कारण स्पष्ट झाले नाही.
कोल्हापुरात 24 तासात दोन घटना
राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोल्हापुरातूनही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. संपत्तीच्या वादातून कागल मध्ये वडिलांना पत्नीच्या मदतीने ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. संपत्तीच्या वादातून शौचालयात ज्वालाग्राही पदार्थ टाकून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. मुलाने आणि सुनेने ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.