मोहम्मद रिझवान (57) आणि बाबर आझम (53) यांच्या अर्धशकांच्या जोरावर पाकिस्तानने टी 20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा 7 विकेट राखून पराभव केला. या विजयासह पाकिस्तानने 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठली आहे. फायनलमध्ये आता त्यांचा सामना भारत विरुद्ध इंग्लंड या दुस-या सेमी फायनलमधील विजेत्या संघाशी होईल. 13 नोव्हेंबर हा सामना रंगणार आहे.
153 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने वेगवान सुरुवात केली. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी डावाची सलामी दिली. न्यूझीलंडसाठी ट्रेंट बोल्ट पहिले षटक टाकले. मोहम्मद रिझवानने डावाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारून संघाला चांगली सुरुवात करून दिली. याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर न्यूझीलंडचा यष्टिरक्षक कॉनव्हेने एक झेल सोडत बाबर आझमला जीवनदान दिले. पहिल्या षटकाच्या अखेरीस पाकिस्तानची धावसंख्या बिनबाद सात धावा होती. यानंतरचे साऊदीचे दुसरे षटक खेळून काढले. या षटकात त्यांना दोनच धावा काढता आल्या.
मात्र. तिस-या षटकात रिझवान-बाबर जोडी आक्रमक झाली. बोल्टच्या या षटकात तीन चौकार फटकावून 15 धावा वसूल करण्यात आल्या. यानंतर चौथ्या षटकात 8 धावा घेतल्या. पण पुन्हा पाचव्या षटकात बोल्टच्या वेगाविरुद्ध रिझवान-बाबरने आक्रमण केले आणि या षटकात 15 धावा चोपल्या. पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात एका चौकाराच्या सहाय्याने 8 धावा मिळवण्यात या जोडीला यश आले. 6 षटकांअखेर पाकिस्ताने 9.17 च्या रन रेटने बिनबाद 55 धावा फटकावल्या. पॉवर प्ले नंतर धावा काढण्याची काढण्याची गती थोडी कमी झाली. 10 षटकांअखेर 8.7 रन रेटने बिनबाद 87 धावांपर्यंत मजल मारली. 11 वे षटक पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसाठी चांगले गेले. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर दोन धावा काढून बाबरने 50 धावा पूर्ण केल्या. या स्पर्धेतील त्याचे हे पहिलेच अर्धशतक आहे.
12 व्या षटकात बाबर-रिझवान जोडीने संघाची धावसंख्या 100 च्या पार नेली. टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील त्यांची ही तिसरी 100+ भागीदारी ठरली. 105 धावांवर पाकिस्तानची पहिली विकेट पडली. बाबर आझम 53 धावा करून बाद झाला. ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर डॅरेल मिचेलने त्याचा झेल घेतला. बाद होण्यापूर्वी बाबरने शानदार खेळी करत आपले काम चोख बजावले. त्याने रिझवानच्या जोडीने पाकिस्तानला मजबूत स्थितीत पोहचवले. यानंतर 13.4 व्या षटकात रिझवानने अर्धशतकाला गवसणी घालत 36 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या.