गेल्या काही दिवसांत सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातही फेसबूक या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मचा तर जगभरात सर्वाधिक वापर केला जातो. या माध्यमाचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही समोर आले आहेत. त्यामुळे फेसबूक कंपनीने यूजर्सच्या प्रोफाइलमधील काही गोष्टी हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या 1 डिसेंबर 2022 पासून फेसबूक हे बदल करणार आहे. फेसबूक नेमक्या कोणत्या गोष्टी हटवणार आहे व कशामुळे, तसेच त्याचा फेसबूक युजर्सवर नेमका काय परिणाम होऊ शकतो, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
फेसबूक काय हटवणार?
गेल्या काही दिवसांत भिन्न विचारधारा, मते असणाऱ्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते. विशेषत: राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक मतांबाबत भिन्नता असली, तरी अगदी टोकाची टीका केली जाते. ही बाब लक्षात आल्याने फेसबूकने युजर्सच्या प्रोफाईलमधून इंटरेस्टेड इन, रिलिजियस व्ह्यू, अॅड्रेस, आणि पॉलिटिकल व्ह्यूज या गोष्टी हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
फेसबूकवर खाते सुरु करताना युजर्सना ही सगळी माहिती भरावी लागत होती. ही सर्व आवश्यक माहिती युजर्सच्या प्रोफाइल सेक्शन व बायोमध्ये दिसते. मात्र, आता ही सगळी माहिती द्यायची गरज नाही. तसेच, याआधी युजर्सनी दिलेली माहितीही हटवली जाणार असून, येत्या 1 डिसेंबरपासून हे बदल केले जाणार असल्याचे समजते.
दरम्यान, फेसबूकने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नसली, तरी सोशल मीडिया कंन्सल्टंट मॅट नावरा यांनी याबाबत ट्विट करून या सर्व बदलाबाबत सांगितले आहे. ‘मेटा’च्या प्रवक्त्या कॅमिली वाजक्यूज यांनी फेसबूक हळूहळू बदलत असल्याचे म्हटले आहे.