सैन्य दलातील अग्नीवीर भरतीची जेव्हा घोषणा झाली तेव्हा देशभरातून त्याला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. मात्र, आता हीच अग्निवीर भरती कोल्हापुरात होत आहे. सैन्य दलाकडून याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. आज 22 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर पर्यंत ही भरती प्रक्रिया होणार असून यासाठी कोल्हापूर सह इतर काही जिल्ह्यातील जवळपास 95 हजार हुन अधिक उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.
या जिल्ह्यातील उमेदवार देणार अग्निपरीक्षा – अग्निवीर सैन्य भरतीसाठी कोल्हापुरातील राजाराम कॉलेज येथील मैदान तसेच शिवाजी विद्यापीठ परिसरात असलेले भव्य मैदान या भरतीसाठी निवडण्यात आले आहे. या ठिकाणी सैन्य दलाकडून योग्य तो बंदोबस्त करण्यात आला असून त्याची तयारी सुद्धा आता पूर्ण झाली आहे. आज सकाळपासून ऑनलाईन नोंदणी केलेले उमेदवार या ठिकाणी अग्नीवीर पदासाठी आपली अग्नी परीक्षा देणार आहेत. या भरतीसाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगावसह गोव्यातील उमेदवारांचा समावेश असणार आहे.
11 डिसेंबर पर्यंत भरती प्रक्रिया – येथील राजाराम कॉलेज येथे असलेल्या मैदानावर नाव नोंदणी करून आल्यानंतर पुढील प्रक्रिया शिवाजी विद्यापीठ येथे असलेल्या मैदानावरती होणार आहे. 11 डिसेंबर पर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया सुरू राहणार असून जवळपास एक लाख उमेदवार या ठिकाणी परीक्षा देणार आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने अग्नीवीर पदासाठीची घोषणा केल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये उद्रेक झाला होता. अनेक शेकडो तरुण रस्त्यावर उतरून जाळपोळ करत असलेले पाहायला मिळाले होते. मात्र आता याच भरतीची जेव्हा घोषणा झाली त्यानंतर मात्र हजारोंच्या संख्येने उमेदवार या ठिकाणी नोंदणी करताना दिसत आहेत.