कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी आज सकाळपासूनच गुळ सौदे बंद पाडले आहेत. गुळाला प्रतिक्विंटल 3700 रुपये दर देण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी हे सौदे बंद पाडले. यंदा शेती उत्पन्न बाजार समितीतर्फे शाहू मार्केट यार्डात दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर नव्या हंगामातील गूळ सौद्यास सुरुवात झाली होती. मात्र अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी हे सौदे बंद पाडले. यामुळे लोखोंची उलाढाल ठप्प झाली आहे.
कोल्हापुरातील गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी गुळ सौदे बंद पाडत जादा दर देण्याची मागणी केली. कर्नाटकच्या गुळाला कोल्हापुरी गुळाचे लेबल लावून विक्री करत असल्याचे शेतकऱ्यांनी प्रशासकांच्या निदर्शनास आणून दिले. असा प्रकार कोल्हापूर गुळाला मारक असून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. यावेळी प्रशासकाने असा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याची चौकशी लावून योग्य ती कारवाई करणार असल्याचा इशाराही दिला आहे.